मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

| Updated on: Jul 22, 2024 | 8:00 PM

मध्य रेल्वेने प्रवास करणे आता प्रवाशांसाठी युद्धावर जाण्यासारखे असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लोकसभेत म्हटले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आजही उशिराने सुरु आहे. २५ ते ३० मिनिटे रेल्वे उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर जमा झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
Follow us on

मध्य रेल्वेची वाहतूक आजही उशिरा सुरु आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. कार्यालय सुटण्याची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी घरी परतण्यासाठी या वेळेला निघत असतात. त्यामुळेच मोठी गर्दी आहे. सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर डोंबिवली जवळ एक्सप्रेसचं इंजिन बंद पडल्याने दुपारी वाहतूक विस्कळीत झाली होती. आता संध्याकाळी देखील मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होण्याचंं प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रवासी मात्र हैराण झाले आहेत. दुपारी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिन्सवरुन रवाना झाली होती. त्याच वेळी डोंबिवली जवळ गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. ठाकुर्लीच्या दिशेने नवीन इंजिन रवाना करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

संध्याकाळी देखील गर्दीची वेळ असल्याने गाडीत चढण्यासाठी झुंबड उडाली आहे. वेळेत घरी पोहोचण्याचा प्रवाशांचा प्रयत्न असतो. पण आता रेल्वे सेवा विस्कळीत होत असल्याने घरी पोहोचण्यासाठी रोजच उशीर होत आहे. आज ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लोकसभेत मुंबईच्या लोकल प्रवासाचा मुद्दा उपस्थित केला. लोकल प्रवास करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखे आहे. लोकल प्रवास करताना लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे मंत्री महोदयांनी याला प्राथमिकता देऊन अधिक लोकल सोडाव्यात. अशी मागणी त्यांनी केली आहे.