मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी बदलापूर जवळ थांबली आहे. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर बिघाड आता प्रवाशांना रोजच सहन करावा लागत आहेत. रोज लोकल सेवा उशिराने धावत असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. कार्यालय सुटण्याची वेळ झाली असून चाकरमानी घरी परतण्याच्या वेळेसच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ येथून कर्जतकडे जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल सेवा सुरु असून पुढील सेवा सुरळीत करण्याचं काम सुरु आहे. चुकीचा सिग्नल दिल्यामुळे कर्जतकडे जाणारी मालगाडी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मवर आली. कर्जतकडे जाणारा रेल्वेमार्ग आणि बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म असे दोन्ही मार्ग त्यामुळे बंद झाले आहेत.
मालगाडी अडकून पडल्यामुळे आता कर्जतकडे जाणारी संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवासांची मोठी गर्दी झाली आहे. कर्जत लोकल अंबरनाथहुन मुंबईकडे पुन्हा जात आहे. कर्जत खोपोलीच्या लोकल गाड्या रद्द करून अंबरनाथ होऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना केल्या जात आहेत. मालगाडी काढण्यास आणखी दोन तासाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.