आवश्यकता असेल तरच रेल्वेने प्रवास करा, कल्याण रेल्वे स्थानकावर उद्घोषणा, काय घडतंय?

| Updated on: Jul 08, 2024 | 2:32 PM

पाऊस थांबला असला तरीही मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा ठणठण गोपाळ झालेला दिसत आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर उद्घोषणाद्वारे रेल्वे सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगितलं जात आहे. मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ऐवजी कल्याणवरून सुटेल, अशी उद्घोषणा करण्यात आली आहे. प्रवाशांनी आवश्यक असल्यासच रेल्वेने प्रवास करावा, असं उद्घोषणेतून म्हटलं जात आहे.

आवश्यकता असेल तरच रेल्वेने प्रवास करा, कल्याण रेल्वे स्थानकावर उद्घोषणा, काय घडतंय?
आवश्यकता असेल तरच रेल्वेने प्रवास करा, कल्याण रेल्वे स्थानकावर उद्घोषणा
Follow us on

महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला आज पावसाने चांगलंच झोडपलं आहे. एकीकडे समुद्राला उधाण आलं आहे. मुंबईत समुद्राला भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे रात्रभर मुसळधार पाऊस पडला. रात्रभरात जवळपास 300 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईची अक्षरश: तुंबई झाली आहे. रात्रभरच्या पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं. विशेष म्हणजे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक आज गुदमरली आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यापासून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर रुळ पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आज सकाळपासून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा पासून अप मार्गावर म्हणजे मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद पडली. तसेच डाऊन दिशेला जाणारी देखील वाहतूक बंद पडली होती. आता डाऊनच्या दिशेला जाणारी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होताना दिसत आहे. पण मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक अद्यापही हवी तशी सुरळीत झालेली नाही.

विशेष म्हणजे कल्याणमध्ये पाऊस थांबला आहे. थोडाफार प्रमाणात रिमझिम पाऊस पडतोय. पण पाऊस थांबला असला तरीही मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा ठणठण गोपाळ झालेला दिसत आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर उद्घोषणाद्वारे रेल्वे सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगितलं जात आहे. डाऊन मार्गाला जाणाऱ्या टिटवाळा, कसारा गाड्या जाताना दिसत आहेत. पण मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक अजूनही पूर्ववत झालेली नाही. मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ऐवजी कल्याणवरून सुटेल, अशी उद्घोषणा करण्यात आली आहे. याचाच अर्थ मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते कल्याण दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस आता कल्याण ते जालना अशी असेल, असं रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, प्रवाशांनी आवश्यक असल्यासच रेल्वेने प्रवास करावा, असं उद्घोषणेतून म्हटलं जात आहे. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव होत आहे.

चाकरमाण्यांचा हिरमोड, प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु

कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या अनेक चाकरमाण्यांचा हिरमोड झाला आहे. बराच वेळ झाला तरी सीएसएमटीच्या दिशेला जाणारी गाडी न मिळाल्यामुळे चाकरमाण्यांनी नाराज होत घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची देखील गर्दी आहे. पाऊस थांबल्याने रेल्वे वाहतूक पूर्वपदावर होईल, अशी काही प्रवाशांना आशा आहे. पण ही रेल्वे सेवा कधी पूर्ववत होईल? हा मोठा प्रश्नच आहे. असं असलं तरी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला जात आहे. प्रशासन आपल्या पातळीवर काम करत आहे. पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज पुन्हा पाऊस पडला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. दुसरीकडे रेल्वेकडूनही आवश्यकता असल्यासचं रेल्वेने प्रवास करण्याचं आवाहन केलं जात आहे.