मुंबई: स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हता. निदान धारावीत होणाऱ्या म्युझियममध्ये तरी सहभागी व्हा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठे होता? आणीबाणीत कुठे होता? असा सवाल करतानाच आणीबाणीत तर तुम्ही इंदिरा गांधींशी अॅडजेस्टमेंट केली होती, असा घणाघाती हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कुठे होते असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आम्ही कुठे होतो हे समजण्यासाठी इतिहास वाचावा लागतो. पण तुम्ही कुठे होता? तुमचा तर जन्मही झाला नव्हता. शिवसेना तरी कुठे होती? तुम्हाला इतिहास माहीत नाही. संघाची स्थापना झाल्यानंतर स्वातंत्र्याचा लढा प्रखर झाला तेव्हा हेडगेवारांनी काही वर्ष संघ स्थगित ठेवला. मी स्वातंत्र्य लढ्यात उतरणार आहे. तुम्हीही उतरा असं त्यांनी स्वयंसेवकांना आवाहन केलं. हेडगेवार हे चांगले स्वातंत्र्य सैनिक होते. क्रांतीकारक होते, जरा इतिहास वाचा. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा संघाची सुरुवात केली. हा इतिहास तुम्हाला माहीत नाही, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.
आणीबाणीत तुम्ही कुठे होतात? आणीबाणीत इंदिरा गांधींनी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार जेलमध्ये गेले. लाखो स्वयंसेवक आणि संघाचे कार्यकर्ते तुरुंगात गेले. तुम्ही तर आणीबाणीत इंदिरा गांधींशी अॅडजेस्टमेंट केली. त्यामुळे आजच्या भाषणात कशाचा कशाला धागा जुळत नव्हता. भारत माता की जयची चेष्टाच तुम्ही केली. भारत माता की जय, वंदे मातरम याने स्फूरण चढतं त्याची तुम्ही चेष्टा केली, अशी टीकाही त्यांनी केली.
दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख अशी दोन्ही पदं एकाच ठिकाणी असलेले उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकल्यानंतर शिमगा अजून लांब आहे हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे, दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकलं. संपूर्ण भाषण अतिशय लक्षपूर्ण ऐकताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ते बोलत जरी असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर हात घालतील अशी आशा होती. महाराष्ट्रातील महिला अत्याचार वाढत चालले आहेत त्यामध्ये नेमकं काय करणार आहेत? कायदा पेंडिंग आहे. दिशा कायदा लवकर करुन टाका. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरु आहे. त्यावर तुम्ही काय करणार आहात? असा सवाल त्यांनी केला.
दहा हजार कोटीची फोड मांडाना. रस्ते दुरुस्त करणं, धरणं सुरक्षित करणं यासाठी तुम्ही पैसे दिले असतील तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे? शेतकऱ्याला तुम्ही दहा हजार रुपये हेक्टर, देवेंद्र फडणवीसांनी 20400 रुपये हेक्टर आणि बागायतीला 54000 रुपये हेक्टर दिलं, ज्याला तुम्ही 25 हजार दिलेत त्यावा देवेंद्रजींनी 75 हजार रुपये हेक्टर दिले आहेत. महाराष्ट्रात दोन वादळ आले, अतिवृष्टी झाली, महिलावंवर अत्यातार झाला. मोठ्या प्रमाणात समोर येणारं ड्रग्ज प्रकरण, त्या विषयातही चिमूटवर गांजा म्हणत आहात. याचा अर्थ गांभीर्यच नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांना कदाचित लवकर शिमगा आला असं वाटल्याने आज जेवढा म्हणून केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा शिमगा त्यांनी केला, अशी टीकाही त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
VIDEO: याला तर अक्करमाशीपणा म्हणतात, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका
(chandrakant patil reply to cm uddhav thackeray over his shivsena dasara melava speech)