मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजून दोन महिने आहेत (Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray). राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याचा ठराव मंत्रिमंडळाने मे किंवा जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. आता कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली? आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का?”, असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे (Chandrakant Patil slams CM Uddhav Thackeray).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी (9 एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या या आक्षेपावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. या स्पष्टीकरणावर पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालनियुक्त आमदार होऊ शकत नाहीत”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी घटनेकडे बोट दाखवलं होतं. मात्र, त्यांचा हा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना खोडून काढला. “मुख्यमंत्री कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे ते या ठरावाने पूर्ण होईल, त्यामध्ये तांत्रिक अडचणीचा प्रश्न नाही”, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. त्यांच्या याच स्पष्टीकरणावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
“जयंत पाटील ज्या दोन रिक्त जागांचा उल्लेख आपण करत आहेत त्यांनी पूर्वीच राजीनामे दिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला म्हणून राजीनामे दिले, मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीत”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
जयंत पाटील काय म्हणाले होते?
“भाजपला विनंती, कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हा, छोट्या छोट्या गोष्टीत अडकू नका. राज्यपालांकडे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला, त्यातील एका जागेवर मुख्यमंत्र्यांना ठराव करुन पाठवण्याचा निर्णय घेतला, कोरोनामुळे सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, राज्यपाल नियुक्त जी रिक्त जागा आहे, तिथे मुख्यमंत्र्यांना नेमण्यासाठी राज्यपालांनी मंत्रिमंडळ ठरावाची अट घातली, आम्ही तसा ठराव केला, मुख्यमंत्री कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे ते या ठरावाने पूर्ण होईल, त्यामध्ये तांत्रिक अडचणीचा प्रश्न नाही, राज्यपालांनी वेळ न लावता निर्णय घ्यावा, त्यांची शपथ पूर्ण करावी आणि दोन महिन्यानंतर पुन्हा जी नवी नावं देऊ त्यावेळी आम्ही बघू काय करायचं ते.. त्यामुळे भाजपने यामध्ये लक्ष देण्यापेक्षा कोव्हिड १९ विरुद्ध थोडं लक्ष द्यावं” असं जयंत पाटील म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
कोरोना संकटकाळात सरकारचा पेचही सुटला, उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर
मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट
राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर