मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सूडबुद्धी आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. नियम ध्यानात घेता नारायण राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही. तरीही कोकणात जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नारायण राणे यांनी काही बोलल्यानंतर त्याला विरोधक उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला थेट अटक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाल्या आहेत, तशा या प्रकरणातही बसतील.
राणेसाहेबांची एक बोलण्याची शैली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. एखाद्या नेत्याने काही विधान केले तर त्याला उत्तर देण्याचा प्रघात आहे. लगेच गुन्हा दाखल करणे योग्य नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधानांना जाहीर सभेत चोर म्हणाले होते किंवा त्यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज्यपालांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. हे असे विषय काढले तर किती खटले दाखल करावे लागतील, याचा विचार करावा. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या नाशिकमधील कार्यालयावर झालेला हल्ला भ्याडपणाचा आहे. शब्दांची लढाई शब्दांनीच करावी. असे लांबून दगड मारणे भ्याडपणा आहे.
राज्यात शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारचे राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया काय उमटेल याचा विचार करा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पदानुसार पक्षविरहीत भूमिका आवश्यक आहे. पण त्या सातत्याने पक्षीय भूमिकेतून बोलत आहेत. त्यांची विधाने आणि लेखांच्या आधारे लवकरच त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही ते म्हणाले.
इतर बातम्या:
नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!
Chandrakant Patil slams mva government over Arrest of Narayan Rane