भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना पवनपुत्र हनुमानाशी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हनुमानाइतकी क्षमता आहे. फक्त त्यांना हनुमंतासारखं त्यांच्या क्षमतेची आठवण करुन द्यावी लागत आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या जाबाबदारीतून काढून पक्षाच्या संघटनेसाठी काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काही दिग्गज नेत्यांसोबत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीसाठी गेले होते. जवळपास दोन तासांनंतर हे नेते सागर बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस राजीनामा देणार नाहीत. त्यांनी केवळ तशी भावना व्यक्त केल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी फडणवीसांच्या तुलना हनुमानाशी केली.
“देवेंद्र फडणवीस यांच्यात एवढी क्षमता आहे की, संघटना आणि सरकार या दोघांमध्ये समन्वय करुन ते महायुती आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात. तेवढी क्षमता त्यांच्यात आहे. आता हनुमंतरायामध्ये खूप क्षमता होती. पण हनुमंतरायाला आठवण करुन द्यावी लागत होती की, तुमच्यात क्षमता आहे. तु्म्ही लंकेला जाळून वापस येऊ शकता, असं हनुमंतरायांना आठवण करुन द्यावी लागत होती. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही तेच सांगतोय की, त्यांच्यात एवढी क्षमता आहे की, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून सरकार सांभाळून महाराष्ट्रात ते नवचिंतन निर्माण करु शकतील. ते सरकारमधून बाहेर जाणार नाहीत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, “महाराष्ट्रात थोडासा निकाल कमी आल्यामुळे आमच्या सर्वांना त्याचं दु:ख आहे. एकटे देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी नाही तर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढच्या काळात आम्ही सर्व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करु. विकासाच्या माध्यमातून आणि संघटनात्मक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करु”, अशीदेखील प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.