मुंबई : शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या बॅनरवार सुरू झाला आहे. खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच हा पोस्टरवार सुरू आहे. भाजपने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. दोन्ही पक्षांकडून रोज पोस्टर लावून एकमेकांवर तोंडसुख घेतलं जात असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. पोस्टर लावू नका, प्रतिक्रिया देऊ नका, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
आम्ही सत्तेसाठी एकत्र नाही तर महाराष्ट्र विकासात क्रमांक एकवर राहावा आणि हिंदुत्वाचा विचार वाढावा यासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे फोटो, बॅनर, जाहिरात याला काही अर्थ नाही. कार्यकर्ते अतिउत्साहात काही गोष्टी करतात. मात्र काहीही झालं तरी भाजपा-शिवसेना युती राहणार. कुणीही बोलू नये, बॅनर लावू नये आरोप करु नये, अशा सूचना मी अध्यक्ष म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
भाजप आणि शिवसेना युतीतील जागा वाटपावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपा-शिवसेना युतीतील जागा वाटपाबाबत आमचा केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल. बाकीच्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. मविआमध्ये समन्वय नाही. सत्तेसाठी ते एकत्र होते. निवडणूकीच्या ‘तोंडावर दिल के तुकडे हुये हजार’ अशी त्यांची परिस्थिती होईल, असा दावाही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये वेगवेगळ्या कारमधून गेले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. वेगळ्या कारमध्ये का बसले या चर्चेला काही अर्थ नाही. दोन्ही नेते प्रगल्भ आहेत. कपट कारस्थान त्यांच्या मनात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख भाजपमध्ये येणार असल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे. येत्या 18 तारखेला काँग्रेस नेते आशिष देशमुख भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे देशमुख के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नितेश राणे हे आधीच संजय राऊत प्रकरणावर बोलले. संजय राऊतांना धमक्या या गृहखात्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे यांनी आधीच सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याला बदनाम करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच वेगवेगळे प्रकरण तयार केले जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.