ब्रिजभान जैसवार, Tv9 मराठी, मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला कुणीही विसरु शकत नाही. हा हल्ला म्हणजे मुंबई आणि देशासाठी असणारी एक मोठी जखम आहे. या हल्ल्याची जखम कधीही भरुन काढता येणार नाही, अशीच आहे. या हल्ल्यात शेकडो नागरीक जखमी झाले. अनेकांचा जीव गेला. देशाने अनेक दिग्गज पोलीस अधिकारी, जवान गमावले. हा भ्याड हल्ला खूप भयानक होता. याच हल्ल्याप्रकरणी आता एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी महत्त्वाची कारवाई केली आहे.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. या हल्ल्याप्रकरणी तहाव्वूर राणा विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेने तहाव्वूर राणा विरोधात किल्ला कोर्टात 405 पानी आरोपपत्र दाखल केलंय. पाकिस्तानी लष्करात डॉक्टर असलेला तहाव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाचा हस्तक आहे. तहाव्वूर हा 11 ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात भारतात होता. तसेच तो 20 आणि 21 नोव्हेंबरला मुंबईत होता.
तहाव्वूर राणा याने डेव्हिड कोलमन हेडली याला सहकार्य केल्याचा आरोप आहे. तहाव्वूर राणा हा कॅनडाचा नागरीक आहे. तो पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी अमेरिकेच्या कारागृहात आहे. त्याचं लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 26/11 मुंबई हल्ल्या प्रकरणी चौथा आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
दरम्यान, मुंबई पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे. या हल्ल्यानंतर पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याच्याकडून पोलिसांना खूप महत्त्वाची माहिती समोर आली होती. कोर्टाने अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच त्याला 2018 मध्ये फाशीची शिक्षा देखील देण्यात आली होती.