‘वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये सर्व चालू’, छगन भुजबळ मनोज जरांगेंवर बरसले

| Updated on: Feb 20, 2024 | 6:49 PM

"आज सर्वांना कळालं पाहिजे, हा जरांगे काय आहे ते. कायदेशीर कारवाई तर करणारच. माझ्यावर कुणीही हल्ला केला तरी या जरांगेला आत घेतलं पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस काय करत आहेत?", असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये सर्व चालू, छगन भुजबळ मनोज जरांगेंवर बरसले
Follow us on

मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाचं विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं आहे. त्यामुळे आता मराठा समाजासाठी स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाचा कायदा झालाय. मराठा आरक्षण विधीमंडळात मंजूर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला धमकी दिली जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. “शिवीगाळ, दादागिरी आणि रोज धमक्या सुरू आहेत. मला रोज टपकावण्याची भाषा केली जाते. मनोज जरांगेंनी कलेक्टर आणि एसपींना शिवीगाळ दिली आहे. वरती छत्रपतींचा पुतळा आणि त्याच्याखाली बसून शिवीगाळ केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. अजय महाराज हे तुकाराम महाराजांचे भक्त आहेत. ते मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. ते जरांगेबरोबर काम करत होते, मी संत वैगरे काही मानत नाही. पण त्यांचा अपमान केला आहे”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

“वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये सर्व चालू आहे, मोबाईल बघतो”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. “आज सर्वांना कळालं पाहिजे, हा जरांगे काय आहे ते. कायदेशीर कारवाई तर करणारच. माझ्यावर कुणीही हल्ला केला तरी या जरांगेला आत घेतलं पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस काय करत आहेत? मी मरणाला घाबरत नाही. माझ्याबद्दल घाण गाणी तयार केली जातात. रात्री उशिरापर्यंत डीजे लावला जातो”, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांची सरकारकडे मोठी मागणी

“सर्टिफिकेटमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. कुणबीकरण थांबवलं पाहिजे. आता मराठा आरक्षण दिलं आहे, आता कुणबी कशाला पाहिजे? सगेसोयरे आले पाहिजे, अशी मागणी आहे. मात्र ते नियमात तर बसलं पाहिजे. आमचा सगेसोयरे या शब्दालाही विरोध आहे. हा तर्क बेकायदेशीर आणि संविधानिक आहे आणि कोर्टाच्या विरोधात आहे. आरक्षण मिळालं नाही तर शिक्षणात सुविधा देण्याचा जीआर काढला होता. त्यानुसार मग सर्व समाजाला या सुविधा द्या”, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. “झारखंडने जातनिहाय जनगणना करण्याचा आदेश दिला आहे. तुम्हीही जातनिहाय गणना करा. ओबीसी किती आहेत ते एकदा समोर येउद्या”, असंही भुजबळ सरकारला उद्देशून म्हणाले. जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे ते ओबीसी समाजातल्या मुलांना मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘मग सरकारला हे कळत नाही का?’

“या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत. तुम्ही (पत्रकारांना उद्देशून) सगळं दाखवत आहात मग सरकारला हे कळत नाही का? एक माणूस संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरतोय. त्याच्यावर काहीच कारवाई नाही. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक पोस्ट केली तर लगेच अटक केली जाते. त्याने तर शिवी दिली. मग पोलीस काय करत आहेत? मी पूर्ण सरकार नाही. माझ्यावरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत”, असं भुजबळ म्हणाले.

“तीन न्यायाधीशांनी एकत्र येऊन हा कायदा तयार केला आहे. त्यामुळे हा कायदा कोर्टात टिकला पाहिजे. महायुतीच्या जागावाटपावर बोलण्या इतपत मी मोठा नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात एवढीच मागणी आहे”, अशी भूमिका भुजबळांनी मांडली.