मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज वाशीमध्ये पोहोचला आहे. मनोज जरांगे आपल्या मांगण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन उपोषणाला बसणार आहेत. ते आजच आझाद मैदानाच्या दिशेला निघणार होते. पण सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दाखवला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या मुद्द्याबाबतचा नवा जीआर काढावा, असं आवाहन सरकारला केलं. मनोज जरांगे यांनी अध्यादेशासाठी सरकारला आज रात्रपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने नवा जीआर तयार केला नाही तर उद्या लाखो मराठ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकेल, असं मनोज जरांगे म्हणाले. एकीकडे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांना आज महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यभरात 57 लाख मराठ्यांची कुणबी नोंद सापडली आहे. त्यापैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्याची माहिती सरकारने मनोज जरांगे यांना दिलं. मनोज जरांगे यांनी सर्व मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ओबीसी समाजावर अन्याय झाल्यास आंदोलन सुरु होणार, असं छगन भुजबळ म्हणाले. सरकारने दोन्ही बाजूचा विचार करुन योग्य निर्णय घ्यावा, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. “ओबीसींवर अन्याय झाला असं समजलं तर ओबीसींकडूनही आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूने विचार करून निर्णय घेईल. जी मते चुकीची आहेत, त्याला आम्ही विरोध करतो. ते करणारच”, असं छगन भुजबळ यावेळी ठामपणे म्हणाले.
“कायद्याच्या कसोटीत जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजकाल कुणीही कोर्टात जातो त्याची चिरफाड होते त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असे माझे देखील म्हणणे आहे पण ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. उद्या ओबीसीवर अन्याय झाला असे झालं तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल. दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आमची मतं जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो आणि आम्ही ती मांडू”, असं छगन भुजबळ म्हणाले.