सध्या बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. सध्या ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआरमध्ये छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग अचानक बंद करण्यात आले. यामुळे छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना तीन तास तात्कळत बसावं लागल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या पीव्हीआर चित्रपटगृहात आज छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग होते. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. हे स्क्रीनिंग सुरु असताना अचानक स्क्रीनिंग बंद पडले. त्यामुळे प्रेक्षक आक्रमक झाले. साधारण तीन तास हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसावं लागलं.
याबद्दलची माहिती ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांना मिळाली. ते लगेचच पीव्हीआरमध्ये पोहोचले. त्यांनी याबद्दल जाब विचारला. त्यानंतर सुनील शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“छावा चित्रपट पाहण्यासाठी बसलेल्या प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी सतत अडथळा येत होता. आवाज बंद होत होता. तसेच स्क्रीनवर काळ्या रंगाचे सतत पॅच येत होते. यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक लोक चित्रपट गृहातून बाहेर पडले आणि त्यांनी आमची काहीतरी व्यवस्था करा, असे पीव्हीआर व्यवस्थापनाला सांगू लागले. पण पीव्हीआरने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. यानंतर मग लोकांना पैसे परत द्या, अशी मागणी केली. पण त्यांनी पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला की हे महाराजांचा अपमान करत आहेत का?” असे सुनील शिंदे म्हणाले.
सुनील शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पीव्हीआर व्यवस्थापनाने प्रेक्षकांना पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय जर प्रेक्षकांना चित्रपट पाहायचा असेल तर ते पुढील आठवड्यात येऊन बघू शकतात, असं पीव्हीआर व्यवस्थापनेने सांगितलं आहे.