Devendra Fadnavis first press conference: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची सूत्र आज घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पत्रकार संघात आले. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाने पहिला निर्णय आरोग्य विभागाच्या घेतल्याचे सांगितले. तसेच माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तर दिले. विरोधक कमी आहेत? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत विरोधकांना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पहिल्या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले की, विरोधक कमी आहेत. परंतु त्यांचा आवाज दाबणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्याला तितका सन्मान आम्ही देऊ. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षांना करायचा आहे. हा निर्णय सरकारचा नव्हता. लोकसभेत दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपद नव्हते. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष असलेल्या पक्षाच्या नेत्याला तसेच अधिकार मिळाले होते.
जनतेने आम्हाला जो कौल दिला आहे, त्यानुसार आता स्थिर सरकार मिळणार आहे. जनतेला दिलेल्या आश्वसनाची पूर्तता आम्ही करणार आहोत. आता जनतेचा मोठा कौल मिळाला आहे. त्याचा दबाव आमच्यावर आहे. जनतेच्या अपेक्षांचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना सुरुच राहणार आहे. त्यात 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की, अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवले. ते अतिशय गतीशील सरकार होते. अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे. आता महाराष्ट्र या गतीला थांबणार नाही. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे राहील. 7,8,9 डिसेंबर विधानसभा विशेष अधिवेशन आहे. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यपालांना पत्र देण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण झाली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
एकनाथ शिंदे यांची नाराजी नव्हती. त्यांच्याशी मी चर्चा केली होती. त्यांना मी विनंती केली आणि ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकरण्यास तयार झाले. परंतु नाराजीच्या बातम्या चालल्या. आमच्यात चांगले समन्वय होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.