अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुड न्यूज’

| Updated on: Mar 03, 2025 | 1:50 PM

Ladki Bahin Yojana: राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही. हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील. पंरतु नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गुड न्यूज
Ladki Bahin Yojana
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर ही योजना बंद होणार? अशी टीका विरोध पक्ष करत आहे. योजनेतून दहा लाख महिलांना वगळले, असा आरोप केला जात आहे. त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यात ही योजना बंद होणार नाही, असे रोखठोकपणे त्यांनी सांगितले. तसेच महिलांची संख्या कमी का झाली? त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही. हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील. पंरतु नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे. कारण ‘कॅग’ने त्याबाबत आपल्यावर टाकले बंधन आहे. त्यानुसार, पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत करता येते. अपात्र लोकांना मदत करता येणार नाही. त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेचे पैसे २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते. सध्या या योजनेत १५०० रुपये महिना पात्र महिलांना दिला जातो. आता २१०० रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

त्या लोकांना सोडणार नाही…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत आहे, त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आम्हाला महाराज पूर्ण माहीत आहे. आम्ही महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर काम करणारे आहोत. महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना सोडले जाणार नाही. परंतु जे हा आरोप करत आहे, त्यांनी इशरत जहांच्या नावाने रुग्णवाहिका सुरू केली आहे. त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सांगू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.