मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला. महाराष्ट्रात विशेष: मुंबईमध्ये कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचे सावट असून, नव्या विषाणूने मुंबईत शिरकाव केला आहे. नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णामध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या वतीने मुलांच्या लसीकरणासाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे.
या ब्लू प्रिंटनुसार’ 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 18 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या वतीने 250 लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरणाला कसा प्रतिसाद मिळतो, यावरून या केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल. 18 वर्षाखाली तब्बल 35 लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेने (who)लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवोव्हॅक्स लसीच्या अपतकालील वापराला परवानगी दिली आहे. लहान मुलाच्या लसीकरणाला परवानगी मिळताच पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटकडून मुलांच्या लसीकरणासाठी 200 कोटी डोसची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून लहान मुलांच्या लसीकरणासाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात आली आहे. सध्या मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू आहे.
या ब्लू प्रिंटनुसार लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, आयसीएमआरची लसीकरणाला परवानगी मिळाल्यास तीन दिवस ते आठवड्याच्या आत लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिला डोस त्यानंतर 28 व्या दिवशी दुसरा डोस आणि 56 व्या तिसरा डोस असे तीन डोस मुलांना देण्यात येतील. त्यासाठी सुरुवातीला 250 लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर खबरादीर म्हणून संबंधित बालकाला अर्धा तास वैद्यकीत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्या येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने, लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी महापालिकेच्या वतीने जगजागृती करण्यात येणार आहे.