मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसब्यातील अल्पसंख्याकांच्या मेळाव्यातून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने चक्क मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच सौदी, कुवेत आणि दुबईला गेलेल्या मुस्लिमांनाही मतदानासाठी पुण्यात बोलावून घ्या, असं आवाहनही केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा अल्पसंख्याक मेळावा प्रचंड वादग्रस्त ठरला आहे. या मेळाव्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून धार्मिक ध्रुवीकरण केलं जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर चित्रा वाघ यांनी हा तर जिहादच असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातय आणि दुबई,सौदीतून मतदार आणा म्हणतात,मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात…
इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…
हा तर एकप्रकारे जिहादच..! https://t.co/1zlWYOcHzS
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 23, 2023
कसब्यातील राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक वेळाव्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी हे विधान केलं होतं. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केलं जातय आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात. मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात… इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…हा तर एकप्रकारे जिहादच..!, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही राष्ट्रवादीच्या या मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबईवरुन लोकं आणा, सौदीवरून लोकं आणा. मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीतील. काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पण आखली जात आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हिरोली यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. उस्मान हिरोली काहीही चुकीचे बोलले नाहीत. चित्रा वाघ मुद्दाम याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात कसबा मतदारसंघातील 1600 मतदार हे दुबई आणि कुवेतमध्ये राहतात.
त्यांना बोलवण्याचा हिरोली यांचा प्रयत्न होता. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे विधान बिलकुल केलं नाही. चित्रा वाघ भाजपचा अजेंडा चालवत आहेत. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे म्हणून असे विधान जाणून-बुजून केलं जातं आहे. शरद पवार यांच्यावर बोलणं चुकीचं आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले.