मुंबई | दि. 12 मार्च 2024 : शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत पवारांना धडा शिकवण्याची भाषा दोन दिवसांपूर्वी केली. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले या दोन पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र उमेदवार असण्याची शक्यता आहे.
ष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे. त्यांनी शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांच्यासारख्या आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावे.
शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या असे वक्तव्य केले आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका-टिपणी करत असतात. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकालदेखील लागू शकतो. हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे वाटत असेल तर वाचाळवीर विजय शिवतारे यांना अडवावे. त्यांना योग्य ती समज द्यावी.
विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवित असतील तर त्यांना समज दिली पाहिजे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते, जागावाटपाची योग्य ती बोलणी करतील. त्यानंतर ठाणे, भिवंडी, कल्याण येथून महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होईल. पण विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावे अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळे चित्र दिसेल, असा स्पष्ट इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते विजय शिवतारे वाचा…
बारामती पवारांचा सातबारा नाही, ६ लाख मतदार विरोधात असल्याचा दावा करत तिसरा खेळाडू मैदानात