मुंबई: काँग्रेसने आज महागाईविरोधात आंदोलन छेडले होते. मुंबईत आयोजित केलेल्या या आंदोलनाला काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र हे आंदोलन भाजपच्या विरोधाऐवजी काँग्रेसमधील वादानेच अधिक गाजले. काँग्रेस नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या वादानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे म्हटले जात आहे.
वाढती महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, तसेच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मात्र ट्रकवर चढण्यावरुन भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात वाद झाला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर म्हणजेच राजगृहावर जाण्यावरुनदेखील नाराजीनाट्य रंगले. यावर खुद्द भाई जगताप यांनी स्पष्टीकरण दिलंय. “झिशान सिद्दिकी माझा मुलगा आहे. तो तरुण आहे. बाबासाहेबांच्या घरी जाण्यासाठी लिस्ट पाठवली होती. त्यात दहा जणांचा समावेश होता. त्यात सगळेच आमदार नव्हते. तुमचं नाव नाही हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. तो आमचा आमदार आहे. पण ठरवणारा मी नव्हतो. बाबासाहेबांच्या घरातील मंडळीने ही नावं फायनल केली होती. नाव नसल्याने त्याला वाईट वाटलं,” असे भाई जगताप यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना “मी त्याला एकट्याला बाबासाहेबांच्या घरी घेऊन जाईल, हा आमच्या घरचा मामला आहे,” असे सांगत दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न जगताप यांनी केला.
पाहा व्हिडीओ :
तसेच या वादावर आमदार झिशान सिद्दिकी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. “दिल्लीतून 12 लोकांची यादी आली होती. ते आत गेले. आम्ही बाहेर आहोत. रस्त्यावर आहोत. कोणताही वाद झाला नाही. सर्व एकसाथ आहोत. माझा आणि सुरज ठाकुरचाही वाद झाला नाही. भाई जगताप म्हणतात राजगृहामध्ये 10 व्यक्तींनाच परवानगी होती. मी मुंबई युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष, आमदार असूनही माझे नाव नव्हते. कदाचित त्यांना ते महत्वाचे वाटत नसावे. आमचे, माझ्या वडिलांचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुने संबध आहेत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले पण 10 लोकांनाच परवानगी होती, हे त्यांनी नाकारलंय,” अशी प्रतिक्रिया झिशान सिद्दिकी यांनी दिली होती.
इतर बातम्या :
100 नक्षल्यांशी सामना, 26 जणांना कंठस्नान, गडचिरोलीच्या जंगलात नेमकं ऑपरेशन कसं राबवलं गेलं?
पाकिस्तानच्या तुरुंगातून 20 भारतीय मच्छिमारांची सुटका, उद्या वाघा बॉर्डरवर भारताकडे सोपवणार