मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कॅगचा अहवाल सभागृहात मांडला आणि सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. मुंबई महापालिकेतल्या तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या कामाचं कॅगकडून ऑडिट करण्यात आलंय. यात कॅगनं अनेक मुद्द्यांवर ताशेरे ओढले आहेत. “हा अहवाल ट्रेलर आहे.कारण लिमिटेड 12 हजार कोटींच्या कामांची चौकशी या अहवालात केलीय. पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी निघतील हे सांगता येत नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबई महापालिकेतील 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हणजेच कोरोना काळात खर्च झालेल्या नऊ विभागांचं ऑडिट करण्यात आलंय. यात पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन, निधीचा निष्काळजीपणे वापर झाल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय.
मुंबई महापालिकेनं 2 विभागांची 20 कामे टेंडर न काढता दिली. एकूण 64 कंत्राटदार आणि मुंबई महापालिकेत करार झाला नसल्यानं 4 हजार 755 कोटींच्या कामांची अंमलबजावणी झाली नाही. 3 विभागांच्या 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती झाली नाही. माहिती तंत्रज्ञान विभागात 159 कोटींचं कंत्राट निविदा न मागवता पूर्वीच्याच कंत्राटदाराला देण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या ब्रिज विभागात मान्यता नसताना अतिरिक्त कामे देण्यात आली. रस्ते आणि वाहतूक विभागात 52 पैकी 51 कामे कुठलाही सर्वे न करता निवडली गेली, असा ठपका कॅगनं ठेवलाय.
कॅगच्या रिपोर्टरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “ट्रेलर संपेपर्यंत हे सरकार कोसळेल. मुंबईवर यांचा राग आहे त्यामुळे असे अहवाल मांडले जात आहेत. माझी मागणी आहे की नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या पालिकांचा कॅगचा अहवाल हिंमत असेल तर आणावा. त्याची चौकशी करावी. मात्र यांच्यात हिंमत नाही. मुंबई महापालिकेला बदनाम करण्यासाठी आणि निवडणुकांसाठी हे सगळं सुरु आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
कॅगच्या अहवालावरुन आज विधिमंडळातही जोरदार गदारोळ झाला. भाजप आणि ठाकरे गटाचे आमदार एकमेकांना भिडले. भाजप आमदार अमित साटम यांनी आपली भूमिका मांडली. “हमसफर डिलर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी कलकत्यात रजिस्टर आहे. तत्कालीन डायरेक्टर कोण होते? तत्कालीन अध्यक्ष नंदकिशोर चतुर्वेदी. मुंबई के लूट की कहानी.. सूनो नंदकिशोर चतुर्वेदी की जुबानी.. त्या नंदकिशोर चतुर्वेदींबरोबर दुसरे कोण डायरेक्टर होते? माधव गोविंद पाटणकर, श्रीधर माधव पाटणकर, या ज्या कंपन्यांमधून 50 कोटींचं मनी लाँड्रिंग 27 कंपन्यांच्या माध्यमातून या कंपन्यांचे पत्ते आपल्याकडे पाठवतोय.. मनी लाँड्रिंग करुन, पैसे फिरवून पाटणकर, चतुर्वेंदीनी मुंबईकरांचा लुटलेला पैसा गेला कुठे?”, असा सवाल त्यांनी केला.
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी अमित साटम यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. अध्यक्ष महोदय, ज्या कंपनीचा उल्लेख करतायत त्या कंपनीत ज्या लोकांचं नाव घेतायत.. मुंबई मनपातला पैसा या कंपनीत गेला असं म्हणतायत त्याचे पुरावे आहेत? कोर्टात सिद्ध झालंय? चुकीचं रेकॉर्ड जाऊ नये म्हणून कामकाजातून काढून टाका अध्यक्ष महोदय. सभागृह कायद्यानं चालतं.. वाटेल ते बोलाल तर चालणार नाही.. हे काढून टाका, अशी मागणी त्यांनी केली.
“मी दिलेले कागद अँटी करप्शन ब्युरोला पाठवा. तिकडून ईडीला पाठवा, तिकडून मुंबई महापालिकेतला पैसा गेला की नाही गेला हे तिकडे स्पष्ट होईल. तुम्हाला त्याच्यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही आणि कर नाही त्याला डर कशाला अध्यक्ष महाराज”, असं प्रत्युत्तर अमित साटम यांनी दिलं.
कॅगचा रिपोर्ट सभागृहात मांडल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. तर ठाकरे गटानं तत्कालीन नगरविकास मंत्र्यांची म्हणजेच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौकशी करण्याची मागणी केलीय. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, यंत्रणामार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोदींना चोर म्हणतात. हे तर दरोडेखोर आहेत. याच्या सुद्धा संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना या मुद्द्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “कॅग रिपोर्टमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या कामकाजावर ताशेरे ओढल्यामुळे मुंबई पलिका आयुक्तांना निलंबित करून चौकशी करा. पालिका आयुक्तांसोबतच तत्कालीन नगरविकास मंत्री यांची देखील चौकशी करा. छोट्या छोट्या विषयांसाठी चौकशी समिती नेमून आम्हाला त्रास देता मग महापालिका आयुक्त आणि तत्कालीन नगरविकास मंत्र्यांना अभय का?”, असा सवाल करत अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
कॅगचा अहवाल आल्यानंतर योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी यावरुन राजकारण आणखी तापणार आहे.