मुंबई: एमएमआर रिजनमध्ये 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं आम्ही निर्माण करणार आहोत. त्यामुळे मुंबईला आजूबाजूची शहरं जोडली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. मुंबईतील 60 ते 70 लाख प्रायव्हेट कार मुंबईतील रस्त्यावरून बाद होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मेट्रो प्रकल्प उभे राहिल्यानंतर लोकं मेट्रोतून प्रवास करतील. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मेट्रोबाबतचे आम्ही तात्काळ निर्णय घेतले. निर्णय घ्यायला धाडस लागतं. ते आम्ही केलं, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
टीव्ही9 मराठीने दादरच्या सावरकर स्मारकात ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुणदास यांनी केलं. यावेळी टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाचा महासंकल्पच मांडला. कोणते प्रकल्प राज्यात सुरू आहेत. ते कधीपर्यंत पूर्ण होणार आहेत. याची माहिती त्यांनी दिली.
आमच्या सरकारला मुंबईपुरता विकास मर्यादित न ठेवता पालघरपर्यंत हा विकास पोहोचला पाहिजे याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचं काम सुरू झालं. आता लोक त्या रुटवरून जाण्यासाठी प्रायव्हेट कार घेत नाही. मेट्रो 3 सुरू होणार आहे. त्याचाही लाखो लोकांना फायदा होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगितलं.
येत्या दोन वर्षात मुंबईला खड्डे मुक्त करण्याचा महासंकल्पही त्यांनी व्यक्त केला. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी साडे सहा हजार कोटींचं टेंडर काढलं. आता उरलेले रस्ते पुढच्या महिन्यात मार्चमध्ये करायला घेणार आहोत. मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण केल्यानंतर तुम्हाला मुंबईत खड्डे शोधावे लागतील, असा दावा त्यांनी केला.
आमचं सरकार सहा सात महिने झाले. सहा सात महिन्याचा कार्यकाळ पाहिला तर कमी आहे. पण कमी वेळातही आम्ही जी काही कामं केली ती तुमच्यासमोर आहे. त्यात इन्फ्रा प्रकल्प सुरू आहेत. जे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झाले.
मी त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री होतो. कोविडच्या काळात बरचंस काही थांबलं. सरकार स्थापन झाल्यापासून वॉर रुममध्ये आम्ही हे प्रकल्प हाती घेतले. टीम कामाला लागली. आम्ही समृद्धी महामार्ग ओपन करून टाकला.
जे अंतर 18 तासाचं होतं. ते आता सहा ते सात तासांवर येणार आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा कमीवेळात आपण नागपूरहून मुंबईला येऊ शकणार आहे. शिवडी न्हावाशेवा हा प्रकल्प हाती घेतला. मुंबई, ठाणे आणि रायगड हा प्रवास दोन तासाचा आहे. पण शिवडी-न्हावाशेवामुळे केवळ 15 मिनिटात मुंबईचा माणूस रायगडला पोहोचेल. आम्ही गोवा आणि पुण्याला त्याला कनेक्ट केलं आहे.
समृद्धी हायवे हा ग्रीन हायवे आहे. आम्ही 18 ठिकाणी नोड तयार करतोय. आम्ही तिथे इंडस्ट्री तयार करत आहोत. तिथे 33 लाख झाडे लावत आहोत. फूड प्रोसेसिंग होणार आहे. सोलर एनर्जी जनरेट करणार आहोत. वाईल्ड लाईफ आहे, त्यावरही आम्ही लक्ष दिलं आहे. जंगलचा फिल यावा असं काम आम्ही केलं आहे.
लाखो लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. इंडस्ट्री येणार आहे. टाऊनशीप येणार आहे. शिवडी-न्हावाशेवा येथेही आपण तेच करणार आहोत. टाऊनशीप करत आहोत. फार्मा हब करत आहोत. टेक्नो हब करत आहोत. तो केवळ रस्ता नाहीये.
मी पूर्वी तिकडे गेलो होतो. तिथे फ्लेमिंगो येतात. आम्ही सांगितलं तिथून फ्लेमिंगो येणं कमी होता कामा नये. आम्ही आधुनिक तंत्राचा वापर करून काम केलं आहे. त्यामुळे फ्लेमिंगो येणं वाढलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखूनच आम्ही काम करत आहोत. आम्ही ग्लोबल वॉर्मिंग लक्षात घेऊनही काम करत आहोत.