गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भविष्य वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या दोन नेत्यांचं काय होणार? भाजप त्यांचं काय करणार? याची भविष्यवाणीच रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. रोहित पवार यांच्या या भविष्यवाणी मागचा आधार काय हे शोधून काढलं जात आहे. रोहित पवार हे मीडियाशी संवाद साधत होते.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केला जात आहे. दुसरीकडे मावळबद्दल बोलून अजितदादांना अडचणीत आणलं जात आहे. दोन्ही लोकनेत्यांचं अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवलं जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवलं जाणार आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असं भाकीतच रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 2019 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याचं तिकीट कोणी कापलं हे त्यांनीही सांगावं. आज बावनकुळे पडळकरांची बाजू घेत आहेत. पण त्यांची परिस्थिती काय झाली आणि कोणी केली याचा विचार व्हावा, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपला कोणताही लोकनेता अडवत नाहीत. पंकजा मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आणि आता नितीन गडकरी यांच्या बद्दल हेच झालं. मोहिते-पिचड यांच्या सारखं एकनाथ शिंदे यांचं होणार. आणि अजित दादांचंही तेच होतंय. शिंदेंच्या बाबतील स्टाईलने निर्णय घेतला जाईल. शिंदेना विधानसभा अध्यक्ष अपात्र ठरवणार नाहीत. पण कोर्टात जाणार आणि ते अपात्र होतील, असा दावाही त्यांनी केला.
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची राज्यसभेत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. या फोटोवरून शरद पवार यांनी पटेल यांना फटकारलं होतं. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवारांनी हा फोटो टाकलेला नव्हता. पटेल यांना जाणवलं की अहंकार असल्याने लोक आपल्या पाठीशी येतील. पण त्यांना आता कळलं आहे की पवार साहेब लोकनेते आहेत. त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. पण त्यांनी कितीही फोटो टाकले तरी काहीच होणार नाही. पवारांच्या पाठीशीच लोक आहेत, असं ते म्हणाले.
निधीसाठी आमदारांकडून प्रतिज्ञापत्रांवर सह्या करून घेतल्या जात आहेत. त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्यट केलं. आमदारांची कामं करून देताना त्यांना ब्लॅकमेल केलं जातंय. विकासकामांसाठी निधी हवा आहे का? प्रतिज्ञापत्र दे असं सांगितलं जातं. सोप्या भाषेत याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, असं रोहित यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवरूनही भाष्य केलं. एकदा गोळी मारली की मारली. ती मारून सॉरी बोलण्यात अर्थ नाही. इजा व्हायची ती झाली आहे, असं ते म्हणाले.