मुंबई | 2 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आज घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे देखील सहभागी आहेत. या बैठकीनंतर लगेच काही वेळाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारकडून मनोज जरांगे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीविषयी माहिती देण्यात आली. या बैठकीत काय-काय चर्चा झाली या विषयी माहिती देण्यात आली.
मराठा आपक्षण उपसमितीच्या पार पडलेल्या बैठकीत तीन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठवाड्यात कुणबी दाखले असलेले उर्दू मोडी दाखले तपासले जाणार आहेत. याबाबत बैठकीत चर्चा झाली. दुसरा विषय म्हणजे मागासवर्ग आयोगाला राज्यभरातून मनुष्यबळ उपलब्ध करून देत मदत करण्याबाबत निर्णय झाला. तसेच या बैठकीत क्यूरेटिव्ह पिटीशन संदर्भात चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली.
मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक पार पडण्याआधी मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “मराठवाड्यात सर्व कुणबी आहेत. त्याचे सर्व पुरावे सरकारला दिले आहेत. ओबीसींच्या 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलं आहे. तत्सम म्हणून मराठ्यांची जात आहे. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर तिथल्या हैदराबादच्या मराठ्यांना आताही आरक्षण आहे याचे पुरावे आम्ही तिथून जाऊन आणले आहेत. आम्ही इथपर्यंत पुरावे दिले आहेत. आतातर नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा पुरावा आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“मला त्यांचं आधी ऐकायचं आहे. त्यांची नेमकी बैठक कशासाठी आहे, त्यांचं नेमकं काय चाललंय, ते पाहिल्यावर भूमिका मांडेल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. सरकारच्या गॅझेटमध्ये सगळे कुणबी आहेत, असंच दाखवलं आहे. तशी आकडेवारीच दिली आहे. कोणत्या तालुक्यात किती मराठा, कुणबी होते याची आकडेवारी दिली आहे. याचे पुरावे आम्ही सरकारला दिले आहेत. मराठवाड्यात मराठा नाहीच तर कुणबी आहेत. मराठवाड्याचे मराठे गेले कुठे?” असं मनोज जरांगे म्हणाले.