राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत. तसचे महिलांसाठीही मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या घोषणा केलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवीन योजना लागू केली आहे. या योजनेनुसार आता राज्य सरकारच ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्ष्यवेधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण आर्थिक स्थिती नसल्याने ते जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ही योजना लागू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता येईल, अशी मागणी या लक्ष्यवेधीतून प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार आहे. मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु करत असताना नियमावली ठरवू, खर्च आणि इतर बाबी पाहू. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवू..
जे लोक इच्छा असून दर्शनापासून वंचित राहतात त्यांना देवदर्शन घडेल त्यासाठी हा निर्णय घेत आहे. ही योजना सर्व धर्मीयांसाठी असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं.
विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. आम्ही काल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक योजना जाहीर केल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली. बेरोजगार तरुणांसाठी योजना केली. मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. शेतकऱ्यासांठी निर्णय घेतला. वारकऱ्यांसाठीही निर्णय घेतला. आज आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्ष्यवेधी आणली होती.
मुख्यमंत्री ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना आणावी अशी मागणी त्यांनी केली होती. ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शनाची इच्छा असते. पण सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती. चार धाम, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्धांची तीर्थक्षेत्र आहेत. हज यात्रेला जातात तसं इतर धर्मीय आपल्या तीर्थक्षेत्राला जात असतात. पण ज्येष्ठांना आर्थिक अडचणीमुळे जाता येत नाही. त्यामुळे ज्यांना जिथे जायचं आहे. त्यांना तिथे घेऊन जाणार आहे. त्यासाठीच ही योजना आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अनेक आमदार दरवर्षी आपआपल्या मतदारसंघातून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जातात. त्यामुळे मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. धोरण ठरवलं जाईल. बायरोटेशन संख्या ठरवली जाईल. अर्ज मागवले जातील, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.