मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठ्या हालचाली मुंबईत सुरु झाल्या आहेत. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या 14 दिवसांपासून मराठा आरक्षणसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी आता पाणी पिण्यासही नकार दिलाय. तसेच त्यांनी औषधही घेणं बंद केलंय. त्यामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झालाय. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर एक जीआरही काढलाय. पण त्या जीआरमध्ये कुणबी वंशावळ हा उल्लेख काढावा, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मराठा आरक्षण सुप्रीम केर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण वैध ठरलं नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आता क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आलंय. या आरक्षणासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण या समितीने तीन महिन्यांनंतरही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती हैदराबाद येथे जावून जुन्या कागदपत्रांची चाचपणी करणार आहे. तोपर्यंत ज्या नागरिकांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी अशी महसूल आणि शैक्षणिक नोंद असेल त्यांना सरसकट मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा आरक्षण दिलं जाईल, असा जीआर सरकारने काढलाय. सरकारने जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. पण जरांगे ऐकायला तयार नाहीत. ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत.
मनोज जरांगे यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. त्यामुळे राज्य सरकारवर देखील दबाव वाढला आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात आहे. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणावर मार्ग काढता यावा यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा संघटनांच्या मागण्या, जरांगे यांची मागणी, त्यावर कुणबी समाजाच्या नेत्यांनी दिलेला इशारा, यावरही चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक नेते या बैठकीला हजर झाले आहेत. या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.