मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबतचा दावा केलेला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील तसाच दावा केला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केला. त्यानंतर याबाबतच्या चर्चांना जास्त उधाण आलं. शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी याबाबतच्या सर्व चर्चांचं खंडन केलं आहे. पण तरी शिवसेनेच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वच आमदार, खासदार आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वरळीच्या एनएससीआय सभागृहामध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. पण या बैठकीत सध्याच्या राजकीय हालचालींवरही खलबतं होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाची संघटनात्मक बैठक आहे. बाकीचा काही विषय नाहीय. आमचा 19 जूनला वर्धापन दिवस आहे. त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होईलच. हा कार्यक्रम कशापद्धतीने साजरा होणार हे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे”, असं नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं.
नरेश म्हस्के यांना 5 मंत्र्यांना डच्चू देण्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मंत्री बदल वगैरे असा कोणताही विषय अजिबात नाहीय. ही मीडियामध्ये पसरलेली बातमी आहे”, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तसेच “थोड्याच दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होईल”, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.