मुंबई : राज्यातल्या बहुचर्चित नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) कालच पार पडलाय. मात्र कोणत्या मंत्र्याला कोणतं खाता मिळणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. हा सस्पेन्स आता लवकरच संपण्याची चिन्ह तयार झालेले आहेत. कारण आज नव्या मंत्रिमंडळाची एक रॅपिड फायर बैठक पार पडली (Cabinet Meeting) आहे. या बैठकीत खाते वाटपाबाबत चर्चा झालेली आहे. तसेच जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबतही चर्चा झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या नव्या मंत्र्यांचं खातेवाटप काही तासातच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस या खाते वाटपाची घोषणा करू शकतात, असेही सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे लवकर प्रत्येक खात्याला नवे मंत्री तसेच प्रत्येक जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळणार आहेत. या संभाव्य खातेवाटपाची यादीही विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आलीय.
गेल्या 40 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे सरकारला घेण्याचे काम विरोधकांकडून होत होतं. राज्यात नव मंत्रिमंडळ नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच मदत पोहोचत नाही, तसेच जनतेची अनेक कामं रखडलेले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून करण्यात येत होता. त्यामुळे आता नवं मंत्रिमंडळ एक्शन मोडमध्ये आल्यानंतर तर शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा होणार का याकडे राज्यातील बळीराजा डोळे लावून बसलाय, गेल्या अनेक दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा या नव्या सरकारकडून लागलीय.