महाराष्ट्राचा महासंकल्प : BMC चे डिपॉझिट आता वाढतंय आधी कुठे जात होतं माहित नाही, CM शिंदेचा टोला

| Updated on: Feb 13, 2023 | 12:44 PM

TV9 मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या विशेष कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेत सत्ता असताना २५ वर्ष जे झालं नाही ते आम्ही करुन दाखवू असं त्यांनी म्हटलंय.

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या विशेष कार्यक्रमात बोलताना अनेक गोष्टींवर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर देखील जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, आम्ही फक्त काम करतोय. अधिकार आल्यानंतर त्याचा वापर लोकांसाठी आणि विकासासाठी केला पाहिजे. अनेक निर्णय आम्ही घेतले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा नसून लोकांसाठी काम करत असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

‘पंतप्रधान मुंबईत येतात कारण ते आम्हाला मदत करतात. पण याचा इतरांना त्रास होण्याची काय गरज आहे. काम जोरात सुरु आहे. तातडीने सर्व खड्डे बुजवायला सांगितलंय.तुम्ही केलं नाही आम्ही करतोय तर पोट का दुखायला पाहिजे.’

‘सहकार्य माहितलं पाहिजे तर मिळतं. कडकसिंग राहून नाही चालत. लोकांसाठी मागितलं पाहिजे. वैयक्तिक नाही मागत आहोत. १५०० कोटी रस्त्यासाठी दिले, महाराष्ट्रासाठी १३५०० कोटी रेल्वेसाठी दिले.’

‘मुंबई काय देशाच्या बाहेर नाही. पंतप्रधान येतात तर चुकीचं काय. जगात त्यांची लोकप्रियता एक नंबरवर आहे. त्यांची एवढी क्रेझ आहे. मुंबईला फोकस करण्याची त्यांना आवश्यकता नाही. त्यांच्या येण्याने कोणाला एसीडीटी होण्याची गरज काय. खड्डे तसेच ठेवले तर तुम्ही काय बोलणार मुख्यमंत्री असून काही केलं नाही.’

‘सरकार स्थापन केलं तेव्हा निवडणुका नव्हत्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम नाही करत. सत्ता कायम कोणाच्या नावावर नसते. २५ वर्ष पैसे असताना विकासापासून वंचित ठेवलं त्यांना लोकं लक्षात ठेवणार. मुंबईकरांचे पैसे त्यांच्यासाठीच खर्च करत आहोत ना.’

मुंबईसाठी काय करणार?

‘निवडणुकीसाठी, मत मिळवण्यासाठी काम करत नाही. मुंबई आर्थिकदृष्ट्या सदन असताना खड्डेमुक्त रस्ते होत नाही, अपघात टाळू शकत नाही. स्वच्छतेचं काम करतोय, रस्त्याच्या बाजुला बाथरुम बनवतोय. कोळीवाड्याचा विकास करतोय. धोकादायक इमारतींचा विकास करतोय. मुंबईकरांचा पैसा त्यांच्या सुविधेवरच खर्च झाला पाहिजे. ‘

‘आमचा डोळा जनतेच्या हितावर आणि विकासावर आहे. मुंबई महापालिकेच्या एफडीचे पैसे हे लोकांचे आहेत. पैसे लोकांच्या करातून मिळाले आहेत. दुषित पाणी समुद्रात टाकून ते दुषित करणार. आरोग्य सेवा केले पाहिजे होते. ते पैसे ठेवून काय लोकांना खड्ड्यातून प्रवास करायला लावणार. खर्च वाढतोय पण डिपॉझिट पण वाढत आहे. यापूर्वी वाढत नव्हते. आधी कुठे जात होते माहित नाही. आम्ही जे काम करतोय १०० टक्के निवडून येणार.’

‘ग्रामीण आणि शहरी भागात कामे करणार, लोकं कामंच बघतात.  सगळीकडे काम करतोय. सगळं करणार आम्ही. मतदार सुज्ञ आहे, ते बरोबर ओळखतात.’ असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.