‘त्या’ जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या चर्चा, एकनाथ शिंदे बघा काय म्हणाले?

| Updated on: Jun 13, 2023 | 4:08 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर शिवसेनेच्या जाहिरातीवर स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याची माहिती समोर आलीय. त्यानंतर शिंदे यांनी याबाबतच्या सर्व चर्चांवर आपली भूमिका मांडली.

त्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या चर्चा, एकनाथ शिंदे बघा काय म्हणाले?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या एका जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती करण्यात आल्याचं म्हटलं आहे. एका सर्वेक्षणाचा आधार देत एकनाथ शिंदे यांचा जाहिरातीत उत्कृष्ट मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये किती टक्के उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती हे देखील नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना शिंदेंपेक्षा कमी टक्केवारीची पसंती दाखवण्यात आली आहे. या जाहिरातीवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. तसेच या जाहिरातीत ‘राष्ट्रामध्ये मोदी, तर महाराष्ट्रात’ शिंदे असंही म्हटलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये या जाहिरातीमुळे नाराजी पसरल्याची बातमी समोर आली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

‘केंद्र सरकारकडून भरघोस निधी’

“मी नम्रपणे एकच सांगू इच्छितो, आमचं सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. हे डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्र सरकारकडूनदेखील महाराष्ट्राच्या विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आर्थिक पाठबळ दिलं जातं. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो सारखे प्रकल्प, पायाभूत सुविधांसारखे प्रकल्प बंद होते. ते प्रकल्प आमच्या सरकारने सुरु केले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय. आम्ही फिल्डवर जावून काम करतोय. शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, प्रकल्पाची पाहणी करायला प्रकल्पाच्या ठिकाणी जातो”, असं शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“सर्वसामान्यांना हवा असणारा विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे. म्हणून या राज्यातल्या जनतेने एका सर्व्हेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामामध्ये पसंती दिली आहे. आम्ही त्यांचा आभारी आहे. आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. आम्ही आणखी जोमात काम करु. आमच्या कामांचा वेग आणखी वाढेल. या कामाचा फायदा सर्वसामान्यांना होईल”, असा दावा त्यांनी केला.

‘पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे मनापासून धन्यवाद’

“मी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मनापासून धन्यवाद देईन. आम्ही पाठवलेले प्रस्ताव, कुठेही काट-छाट न करता तसेच्या तसे मंजूर करतात. त्यामुळेच आम्ही विकासाचे प्रकल्प जोरात, जोमात पुढे नेत आहेत. लोकांनी मनापासून अभिनंदन केलं आहे. फोटो असेल नसेल पण आम्ही दोघंही लोकांच्या मनामध्ये आहोत हे सर्वात महत्त्वाचं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘शिवसेना-भाजप युती सर्व निवडणुकी जिंकेल’

“ही शिवसेना-भाजप युती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर झालेली युती आहे. ही एक वैचारिक युती आहे. स्वर्थासाठी, सत्तेसाठी ही युती झालेली नाही. ही युती महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनातील युती आहे. ही युती येणाऱ्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका लढेल आणि पूर्ण ताकदीने सर्व निवडणुका जिंकेल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.