विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 27 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता या निकालात देण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची असलेली टांगती तलवार दूर झालीय. त्यामुळे राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या निकालाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. याच दिलासामुळे आनंदी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तकंठाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं आहे. लोकसभा सचिवालयामार्फत 84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आणि 60 वी सचिव परिषद आज विधान भवनात पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांची “लाडके आणि व्हिजनरी अध्यक्ष राहुल नार्वेकर” म्हणत कौतुक केलं. त्यांच्या या विशेषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
“ओम बिर्ला यांच्यासोबत एका कार्यक्रमात बोलताना ही परिषद मुंबईत व्हावी असं म्हटलं होतं. तो दिवस आज आला. 21 वर्षानंतर परिषद महाराष्ट्रात होतेय, ही आनंदाची गोष्ट आहे. कालच देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. आपण लोकशाही मजबूत करत आहोत. विधिमंडळाच्या कामात तांत्रिक आधुनिकता आणणे यावर परिषदेत चर्चा होईल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज पेपरलेस करण्याचे काम सुरू आहे. विधिमंडळात लॅपटॉप वापरले जात आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे दोघेही चांगलं काम करत आहेत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“विधिमंडळाची भूमिका लोकशाहीत महत्त्वाची राहिलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य युद्धात महाराष्ट्राचे अनेक सुपुत्र होऊन गेले. गणेश मावळनकर पहिले लोकसभाध्यक्ष होऊन गेले. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. विधिमंडळ मजबूत करण्यास पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. परस्परांशी संवाद लोकशाहीत आवश्यक आहे. विधिमंडळ अधिक मजबूत आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत”, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
“विधिमंडळाचे पावित्र्य राखले जाणे आवश्यक आहे. लोक या सर्व बाबींकडे काळजीपूर्वक नजरेने पाहतात. लोकांचा या संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचं जे बदलतं चित्र आहे, राज्यात 8 लाख 35 हजारांच्या पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे लोकार्पण झाले. अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मोदींजींच्या हस्ते झाले. परिषदेसाठी आलेल्या मंडळींना अटल सेतू दाखवा”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांना केली. “हमारे इरादे अटल हैं, बुलंद हैं”, असं मुख्यमंत्री भाषणच्या शेवटी म्हणाले.