मुंबई : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू यांनी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. कडू यांनी रवी राणा यांना त्यांच्या आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे. रवी राणा यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध केले नाहीत तर बच्चू कडू यांनी आपण सात ते आठ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी इशारा दिल्यानंतरही हा वाद वाढत चाललाय. अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेले सर्व आमदार मनापासून आले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्यात आले नव्हते, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी रवी राणा यांच्या आरोपांवर दिलं आहे.
“माझ्यासोबत सर्व आमदार मनापासून आले. पैशांचं कुठेही देणंघेणं झालं नाही. 40 आमदार, 10 अपक्ष आमदार यांनी एका भावनेपोटी, राज्याच्या विकासासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यामुळे इथे पैशांचा कुठेही विषय येत नाही, येणारही नाही. हे सर्व आमदार आणि कार्यकर्ते माझ्यासोबत मनापासून आले आहेत. त्यांनी मनापासून हा निर्णय घेतला आहे आणि हा उठाव केला आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
रवी राणांना गुलाबराव पाटलांनी सुनावलं
दुसरीकडे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे. “तुमच्या वादामुळे 40 आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना खडेबोल सुनावलं आहे.
“समज घालण्याचे अधिकार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्वच व्यक्तींवर आरोप करणं असं मला वाटतं. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. कुणी विकावू नाहीय. या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे’, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
“रवी राणा यांनी शब्द मागे घेतले नाहीत तर ते चुकीचं होईल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. 40 वर्षांचं करिअर घालून लोकं तुमच्याबरोबर आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना आवर घालावा, अशी माझी विनंती आहे”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी ठणकावलं आहे.
दरम्यान, रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करताना दिसत आहेत. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी रवी राणा यांना मुंबईत बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.