मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार कोसळण्याची भीती वाटते का?; पहिल्यांदाच सीएम शिंदे काय म्हणाले?

| Updated on: Feb 13, 2023 | 11:56 AM

काही लोक हल्ली सर्वोच्च न्यायालयालाही सल्ला देत आहेत. पूर्वी ते उच्च न्यायालयाला सल्ला देत होते. आता कोर्टाला सल्ला देत आहेत. ज्यांची बाजू भक्कम नसते तेच लोक मीडियासमोर येऊन आपली बाजू भक्कम असल्याचं सांगत असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकार कोसळण्याची भीती वाटते का?; पहिल्यांदाच सीएम शिंदे काय म्हणाले?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील सरकार जाणार की राहणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील सरकार कोसळेल काय? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय वाटते? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सरकार पडण्याची मला कसलीही भीती वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.

‘टीव्ही 9 मराठी’ने दादरच्या वीर सावरकर स्मारकात महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली परखड मते मांडली. आमचं सरकार लोकांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे सरकार पडण्याची भीती माझ्या मनात नाही. मला कसलीही भीती वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

म्हणून कोर्टावर भाष्य करत नाही

आमच्याकडे मेरीट आहे. 40 आमदार आमच्यासोबत आहेत. 12 खासदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. कोर्टाने मेरिटवर निर्णय घ्यावा हीच आमची भूमिका आहे. आम्हाला सरकार पडण्याची भीती नाही. आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळेच मी कोर्टाच्या कोणत्याही निर्णयावर भाष्य करत नाही. काही बोलत नाही. कोर्टाला जो निर्णय द्यायचा तो कोर्ट देईल. कोर्टाने काय निर्णय द्यायचा हे आपल्या मनावर नाही, असं शिंदे म्हणाले.

बहुमतामुळेच धनुष्यबाणावर दावा

काही लोक हल्ली सर्वोच्च न्यायालयालाही सल्ला देत आहेत. पूर्वी ते उच्च न्यायालयाला सल्ला देत होते. आता कोर्टाला सल्ला देत आहेत. ज्यांची बाजू भक्कम नसते तेच लोक मीडियासमोर येऊन आपली बाजू भक्कम असल्याचं सांगत असतात. म्हणून मी सांगत नाही, असं सांगतानाच आमच्याकडे बहुमत आहे. बहुमतामुळेच शिवसेना आणि धनुष्यबाणावर आम्ही दावा केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

काही लोकांची पोटदुखी

आम्हाला मुंबई चकाचक करायची आहे. त्यामुळे आम्ही पटापट निर्णय घेतले आहेत. त्याचीच काही लोकांना पोटदुखी होत आहे. पण मी अशा टीकांकडे लक्ष देत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा कामावर भर आहे. ते मी करत राहणार, असंही ते म्हणाले.

मागच्या सरकारमध्ये संधी नव्हती

मागच्या सरकारमध्ये मीही होतो. पण तेव्हा निर्णय घेण्याची संधी नव्हती. आता संधी आहे. त्यामुळे आम्ही पटापट निर्णय घेत आहोत. आमचं सरकार हे गतीमान सरकार आहे. निवडणुका येतील आणि जातील. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत, असंही ते म्हणाले.