अजितदादांच्याच हातावर घड्याळ… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, जे झालं ते…

| Updated on: Feb 06, 2024 | 10:05 PM

त्यात नवीन काय? हे अपेक्षित होते. जेव्हा शिंदे यांना शिवसेनेचा चिन्हा आणि पक्ष दिले, तेव्हाच हे अपेक्षित होते. कायदा, संविधान, लोकशाही काहीही शिल्लक राहिले नाही. कोणाचा ही पक्ष तोडा, कोणाला ही देऊन टाका. लोकशाही, संविधान पायदळी तुडवलं जात आहे. हा निकाल आम्हाला अपेक्षित होता.

अजितदादांच्याच हातावर घड्याळ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, जे झालं ते...
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल लागला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजितदादा गटाकडे दिला आहे. शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. आमदार आणि खासदारांचे संख्याबळ तसेच बहुमताच्या जोरावर हा निर्णय अजितदादा गटाच्या बाजूने लागला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय येताच त्यावर प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मेरीटवर निर्णय झाला. अजित पवार गटाचे अभिनंदन करतो. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आम्हाला मेरिटवर दिलं होतं. त्याची कारण मिमांसा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकशाहीत बहुमतालाच महत्त्व असतं. जो निर्णय अजित पवारबाबत झाला तो मेरिटवर झाला. आता महायुतीला लोकसभेत 45 हून अधिक जागा मिळेल. आणि विधानसभेत पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आम्हालाच पाठिंबा मिळेल

शरद पवार यांच्या बाजूने भावनिक लाट येईल का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोक कामाला महत्त्व देतात. त्यांना काम हवंय. विकास पाहिजे. चौफेर विकास राज्यात होतोय. पायाभूत सुविधेत महाराष्ट्र सरकार अग्रेसर आहे. मोदींचं सहकार्य आहे, पाठबळ आहे. त्यामुळे राज्याचा सर्वांगिण विकास होत आहे. लोक विकासाच्या पाठी राहतील. आमचं सराकर न्याय देण्याचं काम करतंय, असं शिंदे म्हणाले.

पडद्यामागील कलाकार अर्थात ‘हुडी बाबा’

राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मॅच फिक्स, विजेता ठरलेला, अंपायर काय करणार याची कल्पना होती. फक्त चषक कधी द्यायचा हे ठरायचे होते. ते ही आज झाले. अब की बार 400 पारसाठी केलेला किती हा आटापिटा. पडद्यामागील कलाकार अर्थात ‘हुडी बाबा’ आणि महाशक्तीची यातील भूमिका सर्वांना माहिती आहे. लोक उत्तर देतीलच. बाकी राष्ट्रवादीचा सर्वात आश्वासक चेहरा सक्षम आहेच, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोग कठपुतली

त्यात नवीन काय? हे अपेक्षित होते. जेव्हा शिंदे यांना शिवसेनेचा चिन्हा आणि पक्ष दिले, तेव्हाच हे अपेक्षित होते. कायदा, संविधान, लोकशाही काहीही शिल्लक राहिले नाही. कोणाचा ही पक्ष तोडा, कोणाला ही देऊन टाका. लोकशाही, संविधान पायदळी तुडवलं जात आहे. हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. सत्ताधारी ज्या दिशेने नेत आहे, ती दिशा खड्ड्यात टाकणारी आहे. निवडणूक आयोग जर आमदाराच्या संख्येप्रमाणे पक्ष कोणाचा ठरवत असेल, तर निवडणूक आयोग कठपुतली झाला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.