फक्त 60 दिवस उरलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान; नेत्यांना दिले महत्त्वाचे आदेश

| Updated on: Dec 28, 2023 | 9:06 PM

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज व्हिसीद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते. या पक्ष पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.

फक्त 60 दिवस उरलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान; नेत्यांना दिले महत्त्वाचे आदेश
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पक्षाचे पदाधिकारी, खासदार, आमदार आणि मंत्र्यांसोबत संवाद साधला. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. महायुतीत तिसरा पक्ष आल्याने जागा वाटपात घट होणार आहे, त्याचीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नेत्यांची मते ऐकून घेतली. त्यानंतर या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गाफिल न राहण्याचे आणि सर्वांना कामाला लागण्याचे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आपल्या हातात 60 दिवसच उरले आहेत. वेळ कमी असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते, खासदार, मंत्री आणि आमदारांना दिले. महायुती म्हणून ताकदीने लढा, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महायुती म्हणूनच लढा, तंबी

कुठली जागा गेली, कुठली आली हे डोक्यात ठेवू नका. फक्त महायुती म्हणूनच लढण्याचा विचार करा. आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांनी सर्व हेवेदावे बाजूला सारण्याच्या सूचना देतानाच आपल्याला वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाला पाहिजे, असंही म्हटलंय.

असा असेल दौरा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 6 जानेवारी रोजी मुख्यमंत्री यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तर 8 जानेवारी रोजी अमरावती आणि बुलढाणा, 10 जानेवारीला हिंगोली आणि धाराशीव, 11 जानेवारी रोजी परभणी आणि संभाजीनगर, 21 जानेवारी रोजी शिरूर आणि मावळ, 24 जानेवारीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 25 जानेवारीला शिर्डी आणि नाशिक तसेच 29 कोल्हापूर 30 जानेवारी हातकंणगले येथे मुख्यमंत्र्यांचा जाहीर मेळावा होणार आहे. तर पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर कोल्हापूरला होणार आहे.

दोन टप्प्यात मेळावे

शिंदे गटाचे प्रचारमेळावे दोन टप्प्यात पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी यवतमाळ येथून सुरू होणार असून 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याना पुन्हा सुरूवात होणार असून 25 जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप 30जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल.

या प्रचार मेळाव्यांचा समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.