मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांवी वैध ठरवली आहे.
“आमदार संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरविता येणार नाही”, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करताना म्हणाले.
“21 जून 2022 रोजीचा ठराव संमत केल्याने शिंदे शिवसेना अपात्र ठरतील असे म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रतिस्पर्ध्याचा गट उदयास आला तेव्हा शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष होता, असे माझे निष्कर्ष लक्षात घेता याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला. उत्तरकर्त्यांनी भाजपसोबत संगनमत करून काम केल्याचे पुढचे कारण म्हणजे निव्वळ आरोप आहे. त्यासाठी त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे दिलेले नाही. पुढील कारण – त्यांनी पक्षविरोधी विधान केले,.. यालाही पुरावे दिलेले नाही. त्याबाबतचे वृत्त केवळ अफवाच आहेत”, असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं.
“निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे. एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक शिवसेना भवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती. त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते”, असंही अध्यक्ष म्हणाले.
“२१ आणि २३ जून २०२२ शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहे. या दिवशी शिंदे गट हाच खरी शिवसेना. भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती वैध आहे. एकनाथ शिंदे यांचे गटनेते पदी नियुक्तीही वैध आहे”, असा मोठा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला.