मुंबई : देशद्रोह केलेल्यांसोबत चहा घेण्याची वेळ टळली, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. देशद्रोह्यांसोबतची चहापानाची वेळ टळली असं मुख्यमंत्री म्हणाले तर त्यांचं चहापान कुणाबरोबर होतं? देशद्रोह्यांबरोबरच चहापान टळलं असं म्हणता तर विरोधक देशद्रोही होते का? ते देशद्रोही नव्हते. तर मग तुमचं चहापान कोणत्या देशद्रोह्यांसोबत होतं? मुख्यमंत्र्यांनीही देशद्रोही कोण आणि कुणाबरोबर चहापान घेणार होते हे स्पष्ट केलं पाहिजे. ते देशद्रोही कुणाला बोलले हे कळू द्या, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत यांनी आमदारांना चोर म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता, मी संजय राऊत काय म्हणाले ते ऐकलं नाही. ते दौऱ्यावर आहेत. राऊत आल्यावर मी त्यांना बोलावून घेईल. ते नेमके काय म्हणाले हे विचारेन. त्यानंतरच मी माझी प्रतिक्रिया देईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मला भेटायला आले आहेत. त्यांच्याशी युतीची चर्चा सुरू आहे. वंचितला महाविकास आघाडीत घेण्याची चर्चा सुरू आहे. चर्चा पूर्ण झाली नाही. त्यामुळे अर्धवट माहिती मी तुम्हाला देणार नाही. प्रकाश आंबेडकर आत बसले आहेत. तुमच्याशी बोलून झाल्यावर परत त्यांच्याशी बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
आंबेडकर यांच्याशी युती झाली आहे. त्यातून पुढे कसं जायचं हे ठरवू. त्यांच्यासोबतच्या भेटी दिवसाढवळ्या होतात. कुठे हुडीबिडी घालून भेट होत नाही. आम्ही एकमेकांना भेटत राहू, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. कसब्याच्या विजयाचा आनंद आहे. एवढ्या वर्षाच्याभ्रमातून कसबा बाहेर पडत असेल तर देशही बाहेर पडेल, असा चिमटा त्यांनी काढला. तसेच भाजपने कसे आपल्याच लोकांना वापरून फेकले त्याचा पाढाच वाचला. भाजपची निती वापरा आणि फेका आहे. ती निती ते सर्वत्र वापरली. शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला.
त्यांनी अकाली दलापासून ममतापर्यंत तेच केलं. सर्वांना वापरून बाजूला केलं. टिळक कुटुंबीयांच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं. गिरीश बापटांसारख्या नेत्याला तब्येत बरी नसतानाही त्यांना प्रचारात आणलं. नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही त्यांना प्रचारात आणलं. मनोहर पर्रिकर यांनाही त्यांनी तसंच प्रचारात आणलं होतं. पर्रिकरानंतर त्यांच्या मुलांना बाजूला टाकलं. ही त्यांची प्रवृत्ती आहे. सिलेक्टीव्ह वृत्ती आहे, अशी टीका त्यांनी केली.
शिक्षक आणि पदवीधरचे निकाल बोलके आहेत. कसबा पोटनिवडणुकीत इतक्या वर्षाच्या प्रभावाखालून मतदारांनी वेगळा विचार केला हे आशादायक चित्रं आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज मोठी आहे. त्यामुळे भाजपविरोधातील मते वाढत आहेत, असंही ते म्हणाले.