मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आजही विधानसभेत जोरदार घोषणाबाजी झाली. विरोधकांनी आजही सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. पन्नास खोके, एकदम ओकेची घोषणाबाजी केली. त्याला सत्ताधारी आमदारांनी तोडीस तोड उत्तर दिलं. राष्ट्रवादीने नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चांगलंच घेरलं. तर आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे कोणतं तत्त्वज्ञान? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनीही नागालँडमधील राष्ट्रवादीच्या निर्णयावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चिमटे काढले.
विधानसभा सभागृहात पन्नास खोके, एकदम ओके, अशा घोषणा सुरू होत्या. सभागृहात एकच गोंधळ सुरू झाल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना शांत राहण्याच्या वारंवार सूचना दिल्या. आजच्या कामकाज पत्रिकेत खोक्याचा विषय नाहीये. तुम्ही शांत खाली बसा. गुलाबराव खाली बसा. तु्म्ही दिलेली माहिती तपासून घेऊ. चुकीची असेल तर रेकॉर्डवरून काढू, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत होते. इतक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलण्यासाठी उभे राहिले. अध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांना बोलण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली.
दादा, गुलाबरावांनी नागालँडचा जो विषय काढला, तो विषय आज नव्हता. जसं तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता. आता तुम्हीही ऐकायची सवय करा. दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. तुम्ही आतापर्यंत जे बोलत होतात बदलाचे वारे वाहणार आहेत. ते हेच का? नागालँडमध्ये जे झालं ते हेच का? असं गुलाबरावांनी विचारलं त्यात वावगं काय? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
भुजबळ तुम्ही म्हणताय आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. सरकारला नाही. अरे हे कुठलं तत्त्वज्ञान? सोयीचं तेवढं घ्यायचं अन् बाकीचं सोडायचं… कसं चालेल? आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून असं कसं चालेल? एवढच सांगतो पवार साहेब या देशाचे मोठे नेते आहेत. ते जेव्हा जेव्हा जे काही बोलले त्याच्या उलट झालंय. एक कसब्याची निवडणूक जिंकली केवढा आनंद केला. पण तीन राज्ये जिंकले, ते विसरला? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
कसब्यात मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्यांनी जागा दाखवली, असं तुम्ही म्हणाला. मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्व सामान्य नव्हते? त्यांनी तर तुमच्या बालेकिल्ल्यात जागा दाखवली. जेव्हा तुम्ही बोलताना दादा, तुम्ही रोखठोक आहात. पण तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. नागालँडमध्ये जसं झालं. पाठिंबा मागितला नसताना पाठिंबा दिला. 2014मध्ये तुम्ही इकडे तेच केलं होतं. शिसे के घर में रहने वालेने दुसरे को घरोपर पत्थर नही फेकते, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्येक गोष्टी आम्हाला माहीत असतात. प्रत्येकाकडे माहिती असते. पण आम्ही बोलत नाही. तुम्ही रोज रोज बोलत असता. आम्हाला हा विषय संपवायचा. पण पुन्हा पुन्हा हा विषय काढू नये म्हणून मी उभा आहे, असंही ते म्हणाले.