मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सोडण्यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. पण हा तिढा सुटताना दिसत नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस आहे. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा प्रचंड विरोध आहे. त्यांना अर्थ खात देण्यात येऊ नये. अन्यथा त्यांच्याकडून निधी वाटपात दुजाभाव होईल, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांची आहे. याशिवाय रायगड पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले प्रचंड आक्रमक आहेत. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. याशिवाय अनेक मुद्द्यांवरुन शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा तिढा सोडण्यासाठी तीन-चार दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांच्या जंत्री सुरु आहेत.
खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सातत्याने रात्री उशिरापर्यंत बैठका होत आहेत. या तीनही बड्या नेत्यांमध्ये एका पाठोपाठ अशा तीन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. पण या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघालेला दिसत नाहीय.
शिंदे गट काही गोष्टींसाठी आक्रमक आहे. तर ग्रामविकास खातं सोडण्यास भाजपही तयार नाही. तसेच राष्ट्रवादीला सहकार खातं हवंय. पण हे खातं भाजपकडे आहेत. मंत्री अतुल सावे यांच्याकडे हे खातं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आता थेट दिल्लीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात तीन दिवस, तीन रात्री बैठका पार पडल्या. शनिवारी रात्री उशिरा तिघांमध्ये बैठक पार पडली होती. रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास ही बैठक पार पडली होती. त्यानंतर सोमवारी रात्री साडेअकरा ते दीड वाजेच्या दरम्यान बैठक पार पडली होती.
या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला असेल, अशी आशा होती. पण तसं झालं नाही. त्यानंतर पु्न्हा मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री सव्वाअकरा ते दीड वाजेदरम्यान बैठक पार पडली. पण या बैठकीतही तिढा सुटला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच तिढा सुटला नाही, तो आता दिल्लीत सुटेल असं मानलं जात आहे.