मुंबई : “आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे“, अशी एका कवितेची ओळ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray addressing from poetry) यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray addressing from poetry) यांनी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
“आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे. आकाश तर पांघरलं आहे. मात्र प्रत्यक्षात झोप उडाली आहे. सगळे शांतपणे आापापल्या घरामध्ये आहेत. काय करावं, ते कळत नाही. 14 एप्रिलनंतर काय होणार, कळत नाही. त्यातच बातम्या येत आहेत की महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहेच ते तर दिसतंय आणि त्यात लपवण्यासारखं काही नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“हे किती दिवस चालणार असं अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेन की जितकी आपण शिस्त पाळाल, तितका तो लवकर संपेल. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. त्यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचं आहे या सुचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलेल”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
“मुंबई, पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला आणि जगाला दिशा दाखवत आला आहे. या कोरोनाच्या स्थितीत देखील आपण देशाला आणि जगाला दिशा दाखवणार आहोत”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितलं आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा नाही, पण मी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले
“आजपर्यंत आपण जे धैर्य दाखवलं आणि आपल्या सरकारवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. सर्व देशात वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आहेत, मात्र ते एकत्र येऊन कोरोनाशी लढत आहेत. मोदीजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहे. यात राजकारण नको. राजकारण आपल्या पाचवीलाच पुजलं आहे, मात्र, यास्थितीत राजकारण नको. पक्षीय राजकारणाला येथे जागा नाही. यातून बाहेर पडून नक्कीच आपण जागतिक महासत्ता बनू शकतो”, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
संबंधित बातम्या :
30 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार का? मुख्यमंत्री म्हणतात…
Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?
अमेरिकासुद्धा आपल्याकडे औषध मागतेय, आपण जिंकणारच : उद्धव ठाकरे