मुंबई : आजकाल नेत्यांना जशा धमक्या येत आहे ते पाहता त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. बड्या नेत्यांच्या मागे पुढे तर पोलीस गाड्यांचा गराडा असतो. प्रत्येक व्हीव्हीआयपी मूव्हमेंटची (VVIP Movement) खबर ही ट्रॅफिक पोलीस (Mumbai Police) आणि स्थानिक पोलिसांनाही देणं पोलीस सोयीचं समजतात. त्यामुळे नेत्यांच्या चोख सुरक्षेची अपेक्षा केली जाते. मात्र आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Cm Uddhav Thackeray) ताफ्यात अचानक घुसलेल्या गाडीने काही काळ सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. एका बाजुने मुख्यमंत्र्यांचा ताफा येत असताना एक गाडी अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवी गेल्याचे दिसून आले. या गाड्यांचा वेग कमी होता म्हणून अपघात टळला, नाहीतर हे प्रकरण आणखी गंभीर झालं असतं. या गाडीची सध्या चर्चा सुरू झालीय.
आज आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तसेच मिलिंद नार्वेकर असे नेते गेले होते. मुख्यमंत्र्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. मात्र परतीच्या मार्गावर असताना मुख्यमंत्र्यांचा ताफा हा कमी वेगाने येत होता. तेव्हा अचानक एक गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडवी आल्याने काही काळ काय होतंय हे कुणालाच कळेना. काही वेळातच ही गाडी बाजुला होत दुसऱ्या रस्त्यावर वळली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला एखादी गाडी अशी कशी अडवी येऊ शकते, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवर आणि सुरक्षेवरही प्रश्नचिंन्हं उपस्थित केलं जातंय.
अशा मोठ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा ताफाही तैनात असतो. यावेळी पोलिसांच्या काही गाड्या या पुढे असतात. तसेच पोलिसांचं एक वाहनं हे पुढे धावत पुढच्या गाड्या हटवण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे काम करत असते. त्यामुळे असा प्रकार कधीही घडताना दिसून येत नाही. तसेच ज्या मार्गावरून या व्यक्ती जाणार असतात त्या मार्गावरील वाहतूक कर्मचाऱ्यांची मदत घेऊन गाड्यांचा ताफा जाईपर्यंत इतर गाड्या थांबवल्याही जातात. मात्र आज अशी कोणतीच खबरदारी का दिसून आली नाही? असा सवाल विचारण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी साधी या गाडीची चौकशीही केली नाही, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ काही कारवाई का केली नाही, असे एक ना अनेक सवाल आता लोक विचारत आहेत.