मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (8 ऑगस्ट) रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील भाजप नेत्यांकडून मंदिरं सुरु करण्याबाबतची मागणी केली जात आहेत. तसेच काही मंदीर प्रशासनाकडूनही तशी मागणी केली जात आहे. या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. राज्यातील सर्व मंदीर, प्रार्थना स्थळं हे लवकरच उघडले जातील. त्यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“माझ्याजवळ दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी आले होते. त्यांच्या अडचणी समजू शकतो. चार वाजेपर्यंतच मुभा आहे. पुढे कसं करणार, असं ते म्हणत होते. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी सुद्धा सहकार्य करण्याचं मान्य केलं. येत्या सोमवारी म्हणजे उद्या आपण राज्यातील टास्क फोर्सचा आढावा घेतो. त्यानंतर आपण काही नियमावली समजून घेतो. त्यानंतर राज्यातील रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थना स्थळे एक-एक टप्प्याने सुरु करु. मात्र, यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागणार आहेत. सगळ्यांचा संयम आता थोडा-थोडा तुटत आला आहे, याची मला कल्पना आहे. पण संयम तुटू देऊ नका. कारण हाच एक धोक्याचा क्षण असतो. कारण ज्यावेळी आपल्याला वाटतं आता कोरोना गेला त्याचवेळी जास्त धोका असतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आपल्याला कोरोनाचे नियम पाळायला हवेत. मास्क घालणं, वेळोवेळी हात धुणं आणि सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. उद्योजक, ऑफिसेस सगळ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेची विभागणी करा. आपल्याला काम बंद करायचं नाही. आपण आपले सर्व कारभार 24 तास उघडे ठेवू. पण कामाच्या वेळा, त्यांची विभागणी करु. गर्दी टाळा. गर्दी वाढली तर रुग्णवाढीची शक्यता असते”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
“काहीजण समाजातील घटकांना भडकविण्याचा प्रयत्न करतात. पण मी महाराष्ट्राच्या जनतेला खरंच धन्यवाद देतो. अशा सगळ्या उचापतीकारांच्या आवाहनाला बळी न पडता जे सरकार सांगतंय ते आपण ऐकत आहात. म्हणूनच महाराष्ट्राचं कौतुक आज जागतिक पातळीवर होत आहे. मुंबई मॉडेलचं कौतुक आज जागतिक पातळीवर केलं जातंय. या कौतुकाचे मानकारी महाराष्ट्राचे नागरिक आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आपले स्वकीय, मित्र असे अनेकजण कोरोना संकटात सोडून गेले आहेत. कोरोनाचं थैमान आपण पाहिलं आहे. इतर देशात काय झालं ते आपण टीव्हीवर पाहिलं आहे. ऑक्सिजनचं प्लांट लावायला सुद्धा बाहेरुन यंत्रसामग्री आणावी लागते”, असंदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :