मुंबई : राज्यात महाविकासआघाडीची सत्ता असली तरी यात मागील काही दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाची भाषा केली जातेय. याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना उत्तर दिलंय. “अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. शिवसेनाही स्वबळाचा नारा देईल. स्वबळ पाहिजेच. तो शिवसेनेचा हक्कच आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. हे सांगताना स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका नाही असंही त्यांनी नमूद केलं (CM Uddhav Thackeray comment on Congress and announcement of independent election).
उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही स्वबळाचा नारा देऊ. स्वबळ तर पाहिजेच. ताकद तर कमावलीच पाहिजे. आपलं बळ असलंच पाहिजे. पण स्वबळाचा नारा म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ. माझ्यासाठी स्वबळाचा तोच अर्थ.”
“आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी माणसाची किंमत क्षुल्लक असताना आणि अपमानजनक जीवन जगताना बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं, पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक असते,” असंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मागील निवडणुकीत आपले काही पराभूत उमेदवार होते. त्यांना सांगितलं तुम्ही पराभूत झाला असला तरी मनाने खचलेले नाहीत. हे बळ आहे ते स्वबळ आहे. अनेक संकटं आली. त्या संकटांना घाबरुन चालणार नाही. घाबरलो तर मी शिवसैनिक कसला, मी माँ आणि बाळासाहेबांचा मुलगा कसला. आजोबा सांगायचे संकटाच्या छाताडावर बसा.”
उद्धव ठाकरे यांनी आघाडीवर थेट भाष्य केलं. आघाडी किती दिवस टिकणार असं म्हणत त्यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला सूचक इशारा देतानाच शिवसैनिकांनाही तयार राहण्यास सांगितलंय. “देशाभिमान पहिला, आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, श्वास आहे. त्यामुळे गैरसमज करु नका, युती तोडली, आघाडी केली, किती टिकणार वगैरे, त्याची काळजी करु नका. आमचा हेतू प्रामाणिक आहे, राज्याचा विकास करणे, गोरगरिबांची आशीर्वाद मिळवणं, त्यासाठी काही करत असू तर याचा अर्थ हे सोडलं आणि ते धरलं असा त्याचा अर्थ होत नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
CM Uddhav Thackeray comment on Congress and announcement of independent election