मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री पत्रात म्हणाले आहेत. (CM Uddhav Thackeray Demand to Rename Aurangabad Airport as Chhatrapati Sambhaji Maharaj).
मुख्यमंत्री पत्रात नेमकं काय म्हणाले?
“औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे (CM Uddhav Thackeray Demand to Rename Aurangabad Airport as Chhatrapati Sambhaji Maharaj).
नामांतरावरुन राजकारण तापलं
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्दावरुन राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तर शिवसेना नामांतरावर ठाम आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेब हा तुमचा आदर्श आहे? असा सवाल केला आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिलं होतं पण आता हे काम होईल”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.
नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध
शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
चंद्रकांत खैरेंचा इशारा
त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांना इशाराच दिला आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले. आता असंच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असं सांगितलं”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
मुंबई सेंट्रलचं नाव बदलण्यासाठी केंद्राची कार्यवाही
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. त्यावर “गेल्या 6 वर्षांपासून आपण पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना पत्र लिहून त्यात राज्य सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं सांगितलं होतं. केंद्राकडून प्राथमिक मान्यता मिळायला हवी होती. ती मिळाली नसल्याचं त्यांना पत्राद्वारे सांगितलं होतं. त्यावर मंगळवारी राज्यमंत्र्यांनी पत्र पाठवून प्रक्रिया सुरु असल्याचं म्हटलं आहे. आता आपण वाट पाहत आहोत. फेब्रुवारीत जयंतीपूर्वी मंजुरी मिळावी”, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.