Shiv Sena: तोच जिल्हा, तशीच सभा; शिवसेना औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेच्या तोडीस तोड सभा घेणार; तारीखही ठरली

| Updated on: Apr 29, 2022 | 5:52 PM

Shiv Sena: शिवसंपर्क अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 14 मे रोजी बीकेसी इथं होणार आहे.

Shiv Sena: तोच जिल्हा, तशीच सभा; शिवसेना औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेच्या तोडीस तोड सभा घेणार; तारीखही ठरली
शिवसेना औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेच्या तोडीस तोड सभा घेणार; तारीखही ठरली
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची तोफ रविवारी औरंगाबादेत धडाडणार आहे. ज्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी विक्रमी सभा घेतली. त्याच मैदानावर आता राज ठाकरे यांची गर्जना होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता शिवसेनेनेही औरंगाबादेत विराट मेळावा घेण्याचं जाहीर केलं आहे. आमचा मेळावा विराट आणि प्रचंड मोठा असा होईल, असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केला आहे. शिवसेना काही कमी नाही. शिवसेनेचाही येत्या 8 जून 2022 रोजी मेळावा होत आहे. हा मेळावा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेप्रमाणे रेकॉर्डब्रेक होईल. त्यावेळीविरोधकांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मला राज ठाकरे यांच्या सभेच्या अटी शर्तीबाबत बोलायचं नाही. भाजपची सुपारी घेऊन महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न राज यांनी केला आहे. औरंगाबादच्या सभेत ते दिसून येईल, असं ते म्हणाले.

विनायक राऊत मीडियाशी संवाद साधत होते. भोंगा हा मशिदी पुरता मर्यादित नाही. मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यावर कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मशिदी प्रमाणे मंदिरावरही कारवाई झाली आहे. महाराष्ट्रातही कारवाई करायची झाली तर मशिदीप्रमाणे इतर धर्मीयांच्या भोग्यांवर कारवाई करावी लागेल. त्यामुळे राज्यातील भजन कीर्तनालाही कारवाईचा फटका बसेल, असं राऊत म्हणाले.

14 मे रोजी बीकेसीला सभा

सर्वच पक्षांचा कोलहाल चालू आहे, कोण औरंगाबादमध्ये सभा घेत आहेत, कोण मुंबईमध्ये घेत आहे. भाजप व भाजपचे मित्रपक्ष घाणेरड्या वृत्तीने महाविकास आघाडीवर तुटून पडत आहेत, त्या सर्वाना सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा तसेच शिवसंपर्क अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 14 मे रोजी बीकेसी इथं होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या मेळाव्यात सौ सोनार की एक लोहार की दिसून येईल, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

खासदारांच्या अडचणी जाणून घेणार

पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक घेत आहेत. लोकसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वर्षातून दोनदा ते खासदारांना बोलवतात. त्याचाचा एक भाग म्हणून आज बैठक बोलावली आहे. खासदारांच्या अडचणी काय आहेत? खासदारांना केंद्राकडन निधी कमी मिळत आहे, याचा ते आढावा घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

बदमाश मित्राला ओळखायला उशीर झाला

बदमाश आणि कृतघ्न मित्राला ओळखायला शिवसेनेला उशीर झाला हे आमचं दुर्दैव आहे. अशा प्रकारची बदमाशी प्रत्येक निवडणुकीत आम्हाला दिसून आली आहे. प्रत्येक वेळेला भाजप युती करायचा आणि इतरांशी संगनमत करून शिवसेनेला धोका देण्याचे काम करायचे. अनेक वेळेला शिवसेनेच्या उमेदवारांच्या लक्षात आलं होतं, अशा पद्धतीच्या तक्रारी पक्षप्रमुखांकडे केल्या गेल्या. वेळीच कृतघ्न मित्राला ओळखलं असतं तर शिवसेना आजच्यापेक्षा अधिक पुढे गेली असती, असंही ते म्हणाले.

राणा दाम्पत्यांकडून रजिस्टरमध्ये फेरफार

राणा दाम्पत्यावर गुन्हे तर आहेतच, पण नवनीत राणांवर जात प्रमाणपत्र खोट मिळवल्याचा आरोप आहे. अनेक पत्रांमध्ये फेरफार केला. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या रजिस्टरमध्ये सुद्धा फेरफार केला गेला. त्यासंबंधीचा अहवाल हैदराबादमधून प्राप्त सुद्धा झाला आहे. आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ती गैरकृत्याचा आधार घेत केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आधी विक्रांतवर बोला

किरीट सोमय्या यांनी विक्रांत घोटाळा केला आहे. त्याबाबत किरीट सोमय्या आजही स्पष्टीकरण करू शकले नाहीत. स्वतःवर झालेल्या आरोपाचं स्पष्टिकरण करा आणि मग इतरांच्या मागे लागा, असा टोला त्यांनी सोमय्यांना लगावला.

भावना गवळी सहीसलामत बाहेर पडतील

केंद्रातील भारतीय जनता पक्ष आपल्या केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करत आहे. भाजपचं राज्य नाही तिथे केंद्रीय एजन्सीमार्फत कारवाई करत आहे. भावना गवळी यांनी अगोदर स्पष्टीकरण केले आहे. नक्कीच त्यांना ईडीचा त्रास दिला जात आहे. त्यातून त्या सहीसलामत बाहेर पडतील अशी मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावरील आरोपांचं स्पष्टीकरण केलेल आहे. ज्याने हे कुभांड रचले आहे त्याचा पर्दाफाश ते करतील, असं ते म्हणाले.