मुंबई : महाराष्ट्रात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. (CM Uddhav Thackeray Cabinet Meeting over Corona pandemic)
सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण’ मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होतील, अशी अटकळ बांधली जात होतीच.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
1. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.
2. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.
3. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.
4. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती. (Cabinet Meeting over Corona pandemic)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. pic.twitter.com/z0Ejq0C7vB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत ‘मातोश्री’हून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता.
सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली. दोन आठवड्यापूर्वीही उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते, यावेळी मात्र मुख्यमंत्री गाडीने एकटेच गेले. (CM Uddhav Thackeray Cabinet Meeting over Corona pandemic)