मुंबई : “कोरोना काळात (Corona Pandemic) माझ्या मनावरही प्रचंड दडपण होतं. पण जर मी खचलो असतो तर काय? हा एक मुद्दा होता. शेवटी लढणं आहेच, लढण्याशिवाय पर्याय नाही. हार मानणं तर शक्य नाही. मोठी जबाबदारी आहे. लढण्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर कोरोना योद्धा असेलेल्या पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते (CM Uddhav Thackeray on Corona Pandemic).
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मार्चमध्ये आठवड्यात मुंबई आणि पुण्याला आपल्याकडे दोन-चार रुग्ण सापडले. नंतर आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. अधिवेशन सुरु झालं, अर्थसंकल्प मांडला जाता होता, त्यावेळी मला माहिती यायला सुरुवात झाली की, रुग्ण वाढत आहेत. साहजिकच आहे मी तुमच्या माध्यमातून बाहेरच्याही बातम्या बघत आणि वाचत होतो. मला कुणकुण लागली की आपल्याला रुग्णालय लागणार. मी त्या अधिवेशनाच्या काळातच ज्या ज्या वेळेला बैठका व्हायचा त्यावेळेला आपल्याला कधाचित लष्कराला तर संपर्क नाही करावा लागणार, असा मुद्दा मांडायचो. लष्कराकडे चांगली टेकनिक असते.
दिवसामागून दिवस जात होते. भयानक परिस्थिती होती. अनेक पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली. आपल्याला रुग्णालय कमी पडत होते, रुग्णवाहिकांचा तुटवडा होता, डॉक्टर्स नव्हते, औषध तर अजूनही आलेलं नाही, पीपीई किट नाही, एन-95 मास्क नाही, एकदम तारांबळ उडाली होती. पण सुदैवाने कोविड योद्धे म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत आलात, जे वास्तव आहे ते जनतेपर्यंत आणि आम्हापर्यंत पोहोचवत आलात. तसेच आपले पोलीस, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनी चांगलं काम केलं (CM Uddhav Thackeray on Corona Pandemic).
सुरुवातीला मी सर्वांना सांगत होतो की घराबाहेर पडू नका. त्याकाळात मीसुद्धा कमीत कमी वेळा घराबाहेर पडलो. किंबहुना त्यावरुन माझ्यावर टीका देखील झाली. ठीक आहे. तो राजकारणाचा भाग मी आता आणू इच्छित नाही. पण पहिले दोन महिने आम्ही सगळेजण पहाटेपर्यंत जागी असायचो. अनेक ठिकाणाहून फोन यायचे. दिवस उगवल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ठिकाणांचा आढावा घेत होतो.
टास्क फोर्सची निर्मिती झाली. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे फिल्ड हॉस्पिटल उभारलं. ते सर्व या यंत्रणेचं यश आलं. मग नंतर लक्षात आलं आपण काय काय करु शकतो. जूनपर्यंत वरळी आणि धारावीच्या परिसरात गुंतलेलो होतो. नंतर एकएक औषधं यायला लागले. नंतर लक्षात आलं की, ऑक्सिन महत्त्वाचं आहे. मास्क लावणं आणि हात धुणे हेच सध्यातरी महत्त्वाचे आहेत. लसीचा अजूनही पत्ता नाही.
लॉकडाऊन सुरु होण्याआधी मी 17 मार्चपासून केंद्र सरकारला सतत बोलत होतो की, तुम्ही आम्हाला ट्रेन्स द्या. आम्ही पैसे देतो. आमच्याकडे असलेले मजूर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. त्यांना जोरजबरदस्ती करुन थोपवू शकत नाही. एकेक खोलीत 8 ते 10 लोक राहायची, त्यांना किती आपण सुविधा देणार? हे थांबू शकत नाही. त्यांना जायची परवानगी द्या. पण ते नाही म्हटले.
शेवटी व्हायचं तेच झालं. ज्याकाळात आपण त्यांना जाऊ द्यायला हवं होतं तेव्हा आपण त्यांना थांबवलं. त्यानंतर जेव्हा जाऊ द्यायला नको होतं तेव्हा जाऊ द्यावं लागलं. कारण पर्यायच राहिला नाही. मग हे मजूर एकेक ठिकाणी होते, ते पसरायला लागले. शेवटी राज्यभरात त्यांना थोपवून आपल्याला त्यांची सोय करावी लागली. ठिकठिकाण छावण्या काढाव्या लागल्या. सहा ते सात लाख मजुरांची किमान एक महिना तरी सोय केली. त्यांच्यासोबत डॉक्टर ठेवण्याचा प्रयत्न केला.
या सर्व काळात एक प्रश्न मला भेडसावत होता, त्याचे दुष्परिणाम मला काही प्रमाणात दिसत आहेत, ते म्हणजे मानसिक संतुलन. एका ठिकाणी बसून राहिल्यावर मानसिक संतुलन येतं. शेवटी हे युद्ध आहेच, पण आयु्ष्याचं युद्ध आपण रोज लढवत असतो. रोज आपल्याला रोजी रोटी कमवायची असते. त्यासाठी जी काही दगदग करावी लागते ती करताना, हे युद्ध सुरु असताना अचानक त्याला ब्रेक लागणे, हे सुद्धा लोकांच्या मनावर फार विचित्र पद्धतीने आघात करत होतं.
या सर्व काळात माझ्या मनावरही प्रचंड दडपण होतं. पण जर मी खचलो असतो तर काय? हा एक मुद्दा होता. शेवटी लढणं आहेच, लढण्याशिवाय पर्याय नाही. हार मानणं तर शक्य नाही. मोठी जबाबदारी आहे. लढण्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. सोबतील सर्वजण आहेत, हा जेव्हा विचार येतो तेव्हा लढायला बळ येतं. मीदेखील तेच ठरवलं. आपणदेखील एकमेकांच्या सोबत आहोत. कोरोना साथ असली तरी आपली सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे. या साथीवर मात करणारी आपली साथ महत्त्वाची आहे.