मुंबई: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पराकोटीचं वितुष्ट आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना रोजच पाण्यात पाहत आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच ईडीच्या कारवाया सुरू झाल्याने आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (CM Uddhav Thackeray) नव्हे तर मुख्यमंत्र्यांची पत्नी आणि मुलांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची संपत्ती ईडीने (ED)जप्त केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं चित्रं आहे. दोन दिवासंपूर्वी इंधनाच्या दरावरून पंतप्रधा नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बोल लावला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंतप्रधानांना उत्तर दिलं. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दुरावा निर्माण झाला की काय अशी चर्चा होती. परंतु, त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पडदा टाकला आहे. आमच्या दोघांच्या मनातही ओलावा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, शिवसेना-भाजपची युती होणार नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखत घेतली. तब्बल तासभर चाललेल्या या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मोदींबाबतच्या संबंधावरही भाष्य केलं. महाराष्ट्र संयम जास्त दाखवतो. आम्ही इतक्या वर्ष यांच्यासोबत होतो. अटलजी पंतप्रधान होते. तेव्हा गोध्रामध्ये दंगली झाल्या. त्यावेळी मोदी हटावची मागणी होत होती. त्याचवेळी लालकृष्ण अडवाणी एका सभेसाठी मुंबईत आले होते. अडवाणी घरी आले होते. आम्ही त्यांच्याशी बोलत बसलो होतो. त्यांनी बाळासाहेबांशी बोलायचं म्हणून सांगितलं. त्यामुळे मी आणि प्रमोद महाजन बाहेर गेलो. यावेळी अडवाणींनी मोदींबाबत चर्चा केली. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं मोदींना बिलकूल हात लावू नका. मोदी गया तो गुजरात गया. हिंदुत्वाला फटका बसेल, असं बाळासाहेब म्हणाले होते, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
मोदींशी काय होतं आमचं नातं? आजही जाहीर सांगतो, मोदींचं नाव घेताना मी त्यांना नरेंद्र भाई म्हणतो. माझ्या मनात आजही त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहेच. व्यक्ती म्हणून नक्कीच आदर आहे. आमचं नातं आहे म्हणणायचं का होतं म्हणायचं हे दोन्हीकडून ठरवलं पाहिजे. माझ्याकडून आहे. याचा अर्थ लगेच युती होईल का असं नाही. मी व्यक्तिगत सांगतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल कुठे तरी ओलावा आहे. तिच आपली संस्कृती आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाची बैठक असताना मोदी इंधनावर बोलले. कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी पेट्रोलचे भाव कमी करा असं त्यांनी सांगितलं की काय असं मला वाटलं. काही राज्यांनी इंधन दर कमी केले. मराहाष्ट्राचा त्यांनी उल्लेख केला. मला वाटलं हे राहून गेलं. काही लोकांना पेट्रोल फुकट वाटलं तर कोरोना नष्ट होईल की काय असं वाटलं. त्यांचं हे बोलणं अनपेक्षित होतं. सर्व संकटात आहेत. मला उणीदुणी काढायची नसतात. पण तुम्ही काढायला लागला तर तुम्हाला आरसा दाखवावा लागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदींनी महाराष्ट्राला उगाच बोल लावला. त्यामुळे मी त्यांना आकडेवारी दिली. माझ्या जनतेसाठी दिली. इंधन दरवाढ हा त्या बैठकीचा मुद्दा नव्हता. खरी आकडेवारी देणं भाग होतं. लोकांचा गैरसमज झाला असता. तो दूर करणं भाग होतं. आजही इच्छा आहे. वेळ गेली नाही. आमचं सरकार आहे. ते चालू द्या. निवडणूक येईलच. निवडणुकीत जनता बघेलच. जनता ठरवेल. पण ती वेळ येत नाही तोपर्यंत छळण्याचा आणि पाडण्याचा अटापिटा करू नका. पण तुम्ही असंच वागणार असाल तर तुमचं शासन पीडित लोक एकत्रं आल्याशिवया राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
संघराज्याच्या दृष्टीने विचार केला. तर आपला देश सर्वांना घेऊन एकत्र झाला आहे. प्रत्येक राज्याची अस्मिता आहे. ती चिरडून त्यांच्या मनाविरुद्ध तुम्हाला राज्य करता येणार नाही. आज आपण देशाला प्राणापेक्षा अधिक मानतो. ती भावना सर्वांच्या मनात असली पाहिजे. सत्तेचा दुरुपयोग कोण करत असेल तर नाईलाजाने दंड थोपटावे लागेल. पश्चिम बंगाल लढला. शिवरायाच्या महाराष्ट्रातील जनतेला लढ म्हणून सांगावं लागत नाही. वेळ आली तर महाराष्ट्र लढायला सज्ज राहील, असा इशाराही त्यांनी दिला.