मुंबई : मुंबईत दादरच्या शिवसेना भवन येथे दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी हाणामारी झाली. या हाणामारीवर भाजपकडून सडकून टीका झाली. या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. या ऑनलाईन कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनसमोर झालेल्या गदारोळावर रोखठोक भूमिका मांडली (CM Uddhav Thackeray said Fighting is not our quality of shiv sena worker).
“दोन दिवसांपासून शिवसेनाप्रमुखांचं एक भाषण व्हायरल होतंय. ते का होतंय हे आपल्याला माहितीय. याला शिवसैनिक म्हणतात. नुसत्या हाणामाऱ्या करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हे आपलं गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक आहे. पण रक्तपाताची ओळख मुद्दामून कोणी करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख अनेकांना आहे, 1992-93 च्या दंगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती. ही सुद्धा शिवसेनेची ओळख. ज्या ज्या वेळी रक्तदान करण्याची वेळ येते, त्यावेळी शिवसैनिक सर्वात आधी पुढे येतो. हे आमचं हिंदुत्व आहे, आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठी आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनसमोर झालेल्या गदारोळावर प्रतिक्रिया दिली (CM Uddhav Thackeray said Fighting is not our quality of shiv sena worker).
राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस नेते स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. याशिवाय भाजपही महाविकास आघाडी आणि शिवेसेनेवर टीका करत आहे. यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भूमिका मांडली. अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू”, असंदेखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
संबंधित बातम्या:
काँग्रेसच्या ‘स्वबळा’ला सुशीलकुमार शिंदे यांचंही बळ; म्हणाले…