मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राज्यात तीन अतिविराट सभा घेऊन राज्याचं राजकारण ढवळून काढलं आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येचा (ayodhya) दौरा जाहीर करतानाच प्रखर हिंदुत्वाचीही भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्याचा फोकस राज ठाकरेंवर असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) तोफही धडाडणार आहे. उद्या शनिवारी बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे. या सभेचे तीन टीझर लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच या तिन्ही टीझरमध्ये फक्त आणि फक्त हिंदुत्वावरच फोकस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्याच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हिंदुत्वावरच अधिक भाष्य केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच शिवसेनेने पोस्टरबाजीही सुरू केली आहे. घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, अशा असंख्य टॅग लाईनही शिवसेनेने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्धव ठाकरे उद्या कुणावर तोफ डागणार? याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
शिवसंपर्क अभियान..
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबईयायलाच पाहिजे..!#YaylachPahije pic.twitter.com/fkvUXYoaYd
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) May 13, 2022
उद्धव ठाकरे मध्यतंरी आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. त्याची एक शस्त्रक्रियाही पार पडली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. परिणामी मुख्यमंत्री घरूनच सर्व कारभार सांभाळत होते. मंत्रालयातही त्यांनी जाणं टाळलं होतं. मुख्यमंत्री आजारी असल्याने नागपूरचं हिवाळी अधिवेशही पहिल्यांदाच मुंबईत घेण्यात आलं होतं. त्यानंतर काही कार्यक्रमात मुख्यमंत्री दिसले होते. मात्र, उद्या होणारी त्यांची ही पहिलीच राजकीय सभा आहे. या सभेतून ते कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्या 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. या सभेसाठी सर्व तयारी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण हेच या सभेचं मुख्य वैशिष्ट्ये असणार आहे. या सभेतून महापालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये अतिविराट सभा घेतल्या. राज यांच्या या सभेतील भाषणांची आणि त्या सभेतील गर्दीची चर्चा झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही सभा अतिविराट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. उद्याच्या सभेतून गर्दीचे सर्व उच्चांक मोडण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. शिवसेनेने पहिल्यांदाच सभेला यायलाच पाहिजे अशी साद शिवसैनिकांना घातली आहे. या पूर्वी सभेला या म्हणून शिवसैनिकांना सांगण्याची वेळ शिवसेनेवर कधी आली नव्हती. यावेळी मात्र सेनेवर शिवसैनिकांना यायलाच पाहिजे, असं सांगावं लागलं आहे. शक्तीप्रदर्शन करण्यासाठीच शिवसेनेला शिवसैनिकांना ही साद घालावी लागल्याचं सांगण्यात येतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे तीन टीझर आले आहेत. या टीझरमधून हिंदुत्वाचा हुंकार देण्यात आला आहे. या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची झलकही दाखवण्यात आली आहे. तसेच यायलाच पाहिजे, असं प्रत्येक व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे. या शिवाय शिवसेनेने काही टॅगलाईन जारी केल्या आहेत. घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व आणि हृदयात राम आणि हाताला काम करणारं आमचं हिंदुत्व आदी टॅगलाईन शिवसेनेने दिल्या आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर जाहीर राजकीय सभा घेत आहेत. मधल्या काळात भाजपने छेडलेलं आंदोलन, राज ठाकरेंच्या सभा, हिंदुत्व, भोंगे, अयोध्या दौरा, राज यांचं पत्रं, ओबीसी आरक्षण, महागाई आदी मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बोलण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेनेवर गेल्या काही काळापासून होत असलेल्या आरोपांचाही आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे समाचार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.