ईडीला मराठी भाषेत फलक लिहिण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Jan 07, 2023 | 12:40 PM

अलिकडेच मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील सर्व दुकानांच्या फलकावर मराठी भाषेत दुकानाचे नाव लिहिण्याचे आदेश काढत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर अनेक दुकानांनी मराठी भाषेत नावे लिहिली आहेत.

ईडीला मराठी भाषेत फलक लिहिण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ED_OFFICE
Image Credit source: ED_OFFICE
Follow us on

मुंबई :  ईडी ( ED) म्हणजेच ( सक्तवसुली /अंमलबजावणी संचालनालय ) या केंद्रीय तपास यंत्रणेच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाच्या फलकावर मराठी भाषेला स्थान न दिल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठी भाषेला डावलले जात असल्याने मराठी भाषेतही कार्यालयाचे नाव लिहिण्याची मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या पाठीवर मराठी भाषेत कार्यालयाचे नाव ठळकपणे लिहिण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षिण मुंबईतील बेलार्ड इस्टेट येथे कार्यालय असलेल्या ई़डी ( अंमलबजावणी संचालनालय ) या केंद्रीय तपास यंत्रणेचे कार्यालय असून या कार्यालयावर असलेल्या फलकांवर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतच संबंधित कार्यालयाचे नाव लिहिले आहे.

अलिकडेच मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील सर्व दुकानांच्या फलकावर मराठी भाषेत दुकानाचे नाव लिहिण्याचे आदेश काढत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर अनेक दुकानांनी मराठी भाषेत नावे लिहिली आहेत.

त्रिभाषा सुत्रानूसार हिंदी, इंग्रजी बरोबरच त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेला प्रथम स्थान देण्याचा कायदा आहे. मात्र ईडीच्या कार्यालयाच्या फलकावर केवळ हिंदी आणि इंग्रजीतच बोर्ड लिहीला आहे. यासंदर्भात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना डिसेंबरमध्ये तक्रार केली होती.

या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी ईडीच्या आयुक्तांना पत्र लिहीले आहे. यात केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानूसार हिंदी, इंग्रजी बरोबरच प्रादेशिक भाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा असल्याने केंद्रीय कार्यालयात मराठी भाषेची काटेकोर अमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आस्थापनामध्ये मराठी भाषेचा प्रयत्नपूर्वक वापर करण्याबाबत सूचना द्याव्यात असे आदेश मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी ईडीला पाठविलेल्या पत्रात केले आहेत.

आम्ही या संदर्भात पाठपुरावा करीत असून केवळ ईडीच्या फलकावर मराठी भाषेला स्थान देणे कायद्याने बंधनकारक असल्याचे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटले आहे.