महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसीत प्रचारसभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख स्वत: शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी असे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीकडून 4 मोठी आश्वासनं देण्यात आली. त्यापैकी एका आश्वासनाची घोषणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातील गरिब कुटुंबांना 25 लाखांचं विमा कवच देणार तसेच सर्व औषधे मोफत देणार, अशी घोषणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “मोदी ज्याला हात लावतात तो पडतो”, अशी खोचक टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
“तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला चांगलं सरकार देऊ. आम्ही तुम्हाला 4 गॅरंटी दिल्या आहेत त्या नक्की पूर्ण करु. आमच्या गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नाहीत की, 15 लाख देणार, 2 कोटी नोकऱ्या देणार, डबल इंजिन सरकार, एमएसपी डबल करणार, असे सर्व खोटे वायदे आहेत. आमचे हे 4 खरे वायदे आहेत. बजेट बघून, विचार करुन आम्ही या गॅरंटी दिल्या आहेत. त्यामुळे खरं बोलणाऱ्यांना तुम्ही सपोर्ट करा. शरद पवार शेतकऱ्यांबाबत बरंच काही बोलले. मी ते परत बोलत नाही. कोणताही देश पुढे घेऊन जायचा असेल तर चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे आरोग्य चांगलं पाहिजे. मी घोषणा करतो की, गरिबांसाठी आम्ही 25 लाख रुपयांचा विमा सरकारकडून देऊ. गरिबांना मोफत औषधं देऊ”, असं आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी दोन वर्षात अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आणणार. तुमची बुलेट ट्रेन कुठे आहे? तो पूल पडला. मोदी ज्याला हात लावतात तो पडतो. पूल पडला. गुजरातमध्ये पूल पडला. त्यांच्या काळात किती पूल पडले आणि किती पैसे यांनी खर्च केला याचे माझ्याकडे आकडे आहेत. त्यांनी रिंगरोड, समृद्धी माहमार्ग, जलयुक्त शिवार अभियानात प्रत्येक ठिकाणी घोटाळे झाले. सीएजीचा रिपोर्ट आहे, मी मनाचं बोलत नाही. छत्रपती शिवरायांची प्रतिमा बनवली. त्यात घोटाळा केला. पंतप्रधान पुतळ्याचं अनावरण करतात आणि तो पुतळा कोसळतो, काय मजबुतीने मोदी सरकार काम करत आहेत, फक्त घोटाळ्याचं काम सुरु आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाने गरिबांना लुटलं जात आहे. 8 हजार रुग्णावाहिका खरेदी करण्याचा देखील एक घोटाळा आहे”, असे आरोप खर्गे यांनी केले.